मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात आज सर्वदूर पावसाची संततधार सुरू असून, मुंबई शहर, ठाणे, पालघरसह सर्व उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी आणि जोरदार वारे वाहत आहेत. विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात जोरदार सरी कोसळत असल्याने बळीराजा आनंदला आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस पडत होता. मुंबईत पावसाने दाणादाण उडविली आहे. पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सततच्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील काळू नदी आणि उल्हास नदीची पाणी पातळी हळूहळू इशारा पातळीच्या दिशेने वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाच्या सरी अधून मधून बरसत आहेत. महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटविण्याचे काम प्रगतीपथावर सुरु होते. या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे सर्व नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडताना काल संध्याकाळी एटापल्ली तालुक्यात बांडे नदीच्या पुलावर साचलेल्या पाण्यात एक चारचाकी जिप वाहून गेली, वाहनातले तीनही जणांना वाचवण्यात नागरिकांना यश आले. सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दल अर्थात एनडीआरएफचे एक पथकं सांगलीत दाखल झाले आहे. गेल्या दोन वर्षांतील पुराची स्थिती पाहता राज्य शासनाकडून ही कार्यवाही करण्यात आली. हे पथक सांगली जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत कार्यरत असणार असून, या पथकात २ मुख्य अधिकार्यांसह २० जवान तसेच पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध आणि सुटकेसाठी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस सुरु होता. धाराशिव जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून सततचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे खरीप पिकांवर चांगला परिणाम दिसत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून, जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि घाट क्षेत्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा, जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट तर ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.