– अभ्यास दौर्यासाठी तेलंगणा सरकारचे शेतकर्यांना निमंत्रण
बुलढाणा (गणेश निकम) – अब की बार किसान सरकार हा नारा देवून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उतरला आहे. बीआरएसने आपली पाळेमुळे ग्रामीण भागात रुजवण्यास सुरुवात केली असून, हैदराबाद येथून आलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काल मोताळा तालुक्याच्या ग्रामीण भागात जाऊन संवाद साधला. त्यांनी ५० सरपंचाना तेलंगणा दौर्यासाठी निमंत्रण दिले असून, लवकरच हे सरपंच रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर रावदेखील त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
२०१४ साली तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. अवघ्या काही दिवसातच तेलंगणामध्ये विकास साधला जात आहे. विशेषतः शेतकर्यांच्या बाबतीत तेथील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अनेक योजना आणल्या आहेत. या ठिकाणी उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यातही मुख्यमंत्री केसीआर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. आज तेलंगणा हे रोल मॉडेल म्हणून पुढे येत आहे. तेलंगणामध्ये झालेला विकास महाराष्ट्रातील जनतेला दाखवण्यासाठी व शेतीमध्ये तेथील सरकारने केलेले विविध प्रयोग कळावे, यासाठी केसीआर यांचे प्रयत्न सुरू आहेत. के चंद्रशेखर राव यांचे विशेषदूत काल बुलढाणा जिल्ह्याच्या दौर्यावर होते. त्यांनी तीन दिवस जिल्हा मुख्यालयी तळ ठोकला. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह जनसामान्यांच्याही त्यांनी भेटीगाठी घेतल्या. विशेषतः घाटाखाली मोताळा तालुक्यात जाऊन त्यांनी सरपंचांशी संवाद साधला.
शेतकरीवर्गात चांगला प्रतिसाद!
तेलंगणामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यात तेथील सरकारला यश आले आहे. तेलंगणा राज्यनिर्मिती फारच अलीकडची आहे. तेथे शेतकरी जीवनात केसीआर बदल घडवू शकतात तर येथे का शक्य होत नाही. पहिल्यांदाच कोणीतरी शेतकरी भाषा बोलत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात चांगला प्रतिसाद आहे.
– अक्षय पाटील, बुलढाणा विधानसभा समन्वयक
दोन गावांमध्ये बांधणार स्वच्छता गृहे!
सिंदखेड लपाली परिसरातील दोन गावांमध्ये तेलंगणा सरकारच्या वतीने स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेणार असल्याचे केसीआर यांचे दूत साईदीप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रतील ग्रामीण भागातील अवस्था तेलंगणाच्या तुलनेत खूपच मागास असल्याचे साईदीप म्हणाले. साईदीप हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार वेणूगोपाल यांचे सचिव आहेत. बुलढाणा जिल्ह्यात बीआरएसचे काम ते पाहत आहेत.