Breaking newsBULDHANACrimeHead linesLONARVidharbha

लोणारमध्ये २० वर्षीय तरूणाचा चाकू, कटरने भोसकून निर्घृण खून

– पळून जाणार्‍या आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले!

लोणार (तालुका प्रतिनिधी) – जुन्या वादातून मद्यप्राशनासाठी बसलेल्या तरुणांनी २० वर्षीय मित्रास चाकू व कटरने भोसकून ठार मारल्याची थरारक घटना काल रात्री लोणार येथे घडली. हत्या करून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या मद्यधुंद तरुणांना लोणार पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून पकडले. खुनाच्या या घटनेने लोणार हादरून गेले आहे. बारमध्ये जेवणासाठी गेलेल्या या तरुणांमध्ये जुना वाद उफाळून आला. या वादातून तीन तरूणांनी एका युवकावर चाकू, कटरने हल्ला केला. यामध्ये प्रचंड रक्तस्त्राव व गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ९ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. रितेश सुनील मापारी (वय २०) असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर असे, की लोणार येथील रितेश सुनील मापारी हा अविनाश राजेंद्र सरकटे व त्याच्या काही मित्रांसोबत मंठा रोडवरील एका बारमध्ये जेवणासाठी गेला होता. तेथे अगोदरच जेवणासाठी उपस्थित असलेल्या शुभम उर्फ विशाल भारस्कर, रा. गारटेकी, ता. मंठा, शुभम नारायण मापारी रा. लोणार व उदय विनोद सातपुते रा. मातरखेड, ता. लोणार यांनी रितेशसोबत जुन्या वादावरून शिवीगाळ केली. यावेळी रितेश मापारी याने तिघांनाही शिवीगाळ न करण्याचे सांगितले असता, शुभम नारायण मापारी, तसेच उदय विनोद सातपुते या दोघांनी रितेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले. तसेच शुभम उर्फ विशाल भारस्कर याने रितेशच्या पोटात चाकू-कटरने खोलवर वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या रितेशला त्याच्या इतर मित्रांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्याला मेहकर येथे नेण्यास सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रितेशचा मृत्यू झाल्याचे समोर आले. रितेशच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी शुभम उर्फ विशाल भारस्कर, उदय विनोद सातपुते, शुभम नारायण मापारी या तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, हे सर्व तरूण दारू पिलेले होते, असे सांगण्यात येते.


पोलिसांनी शिताफीने केले आरोपी जेरबंद

या भयानक घटनेचे गांभीर्य ओळखत मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी एक विशेष पथक तयार करत आरोपीच्या मागावर पाठवले. या पथकामध्ये नापोका संतोष चव्हाण, नापोका संजय जाधव, पोकॉ गणेश लोढे, पो.कॉ. गजानन डोईफोडे, पो.कॉ. अनिल शिंदे यांनी आरोपीचा पाठलाग करत त्यांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास लोणार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निमेश मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलिस करत आहे. या घटनेने लोणारसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!