Breaking newsHead linesMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

शरद पवारांना हटवून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष!

– मी तुमच्यापोटी जन्माला आलो नाही हा माझा दोष आहे का? – अजित पवार;  आमचंच नाणं खोटं निघालं, शरद पवारांनी व्यक्त केली खंत

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच, स्वतःला पक्षाचा अध्यक्ष म्हणूनही घोषित केले. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ३० जूनरोजी मुंबईत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय यापूर्वीच झाल्याचे अजितदादांनी सांगितले. यावेळी बांद्रा येथील भूजबळ नॉलेज सिटीच्या एमईटी सेंटरमध्ये आपल्या गटाच्या बैठकीत अजितदादांनी घरातील भांडण चव्हाट्यावर आणणारे भाषण केले. ते म्हणाले, आपले (शरद पवार) आता वय झाले आहे, आता आशीर्वाद द्या. मी तुमच्यापोटी जन्माला आलो नाही हा माझा दोष आहे का, मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, यापूर्वीही पक्षाला ही संधी मिळाली होती, पण तुम्ही घेतली नाही. आता आपण सेवानिवृत्ती घ्या व आम्हाला आशीर्वाद द्या, अशा शब्दांत अजित पवारांनी काका तथा पक्षाध्यक्ष शरद पवारांना ठणकावले. तर सकाळी ११ वाजता वायबी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीत, जे शिवसेनेसोबत घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेससोबतही घडले आहे. ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांना शिक्षा भोगावी लागेल. आपलाच शिक्का खोटा निघाला, अशा शब्दांत अजितदादांना ठणकावले. दरम्यान, या घडामोडीनंतर दोन्ही गटाचे नेते निवडणूक आयोगाकडे पोहोचले असून, अजित पवारांच्या गटाने पक्षचिन्ह व पक्ष यावर आपला दावा दाखल केला. तर शरद पवार गटाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी दावा दाखल केला. तसेच, ‘निवडणूक आयोगाने पक्षावर व चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजूही ऐकून घ्यावी, अशी हस्तक्षेप याचिकाही दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पक्षचिन्ह ‘घड्याळ’वर दावा सांगितला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘घड्याळ’ पक्षचिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे. पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. ते वाय बी सेंटर सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

विशेष बाब म्हणजे, शरद पवार यांनी सकाळी ११ वाजता तर अजित पवार यांनी दुपारी एक वाजता बैठक बोलावली होती. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शरद पवारांच्या बैठकीला हजेरी लावून नंतर अजितदादांच्या बैठकीलाही पोहोचल्याचे दिसून आले. दरम्यान, शरद पवार यांच्यावर अजितदादांनी कुरघोडी केल्याच्या आजच्या शक्तिप्रदर्शनातून दिसून आले. अजित पवारांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला ५३ पैकी ३२ आमदार हजर असल्याचे दिसून आले. तर शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला १८ आमदार हजर असल्याचे दिसून आले. शरद पवार २०१७ मध्ये भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याचा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला. ते म्हणाले, २०१७ मध्येही वर्षा बंगल्यावर आमची बैठक झाली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून मी आणि इतर अनेकजण तिथे गेलो. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. आम्ही कॅबिनेट पोर्टफोलिओ वाटप आणि मंत्र्यांच्या पदांवर चर्चा केली. पण नंतर आमच्या पक्षाने एक पाऊल मागे घेतले. पवार म्हणाले की, तेव्हा शरद पवार म्हणाले होते की, शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे, तो तिथे असताना युती करता येणार नाही. तीच शिवसेना २०१९ मध्ये धर्मनिरपेक्ष कशी झाली? आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा अजित पवारांनी केला. सर्व आमदार माझ्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तेही आमदार जे दुसर्‍या सभेत (शरद पवारांच्या) आहेत, असे अजित पवार म्हणाले.


तुमचे वय ८२, आता निवृत्ती घ्या!
– तुम्ही कधी थांबणार आहात की नाही?
– अनेकदा माघार घेतली, टीका सहन केली, आता पुरे झाले


अजित पवार यांनी बुधवारी आकड्यांच्या खेळात शरद पवारांचा पराभव केला, पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (एनसीपी) दावा ठोकण्याच्या लढाईत ते दोन तृतीयांश (३६ आमदार) पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. ३२ आमदार त्यांच्या बैठकीला हजर राहिल्याने पक्षावर दावा करण्यासाठी ३७ आमदारांची गरज आहे. त्यामुळे पुढील काळात काकाविरूद्ध पुतण्या ही लढाई मनोरंजक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत कार्याध्यक्ष हे पद नाममात्र आहे व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडेच सर्वाधिकार असतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. पक्षात कोणत्याही नेमणुकीचे अधिकार फक्त राष्ट्रीय अध्यक्ष यांनाच आहेत. त्यामुळेच कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेले निर्णय आणि केलेल्या नेमणुकांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘काही लोकांचं वय झालंय त्यामुळे त्यांनी आशिर्वाद द्यावेत, असं काही जण म्हणाले. का बरं आशीर्वाद द्यावेत. रतन टाटाचं वय काय, सीरम इन्स्टिट्यूट पुनावाला त्यांचं वय काय 84 घेतलं का नाही इंजक्शन. अमिताभ बच्चन वय काय 82. फारुक अब्दुल्ला साहेबांपेक्षा तीन वर्ष मोठा आहे. आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशीर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना फटकारले.


शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली. आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का, असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरीत्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. आजपर्यंत लोकांसमोर मला खलनायक का केले जाते होते, ते कळत नाही. आजही माझे श्रद्धास्थान शरद पवारच आहेत. शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतर मागे घेतला, तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावे, तर ती म्हणाली, ते हट्टी आहेत, ऐकणार नाहीत. शरद पवार आजही माझे आदर्श आहेत. माणूस वयाच्या साठीनंतर निवृत्त होतो; मात्र माणसाने कधीतरी थांब्ाावं… तरुणांना संधी कधी देणार, चुकले तर तुम्ही आम्हाला दुरुस्त करा, कान धरा, मार्गदर्शन करा. आता नवीन पिढी समोर येत आहे. चुकले तर, अजित तुझे चुकले, असे सांगा, चूक मान्य करून पुढे जाऊ, पण कोणासाठी चालले आहे हे, असे चित्र का निर्माण केले जात आहे, अशी विचारणा अजित पवार यांनी केली. आम्हीही पक्ष बांधला, आम्हालाही लोक ऐकतात. आम्हीही नेते आहोत. आंबेगावात शरद पवार यांनी सभा घेतली तर, मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल, असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले.


एका आमदाराला शरद पवार म्हणाले की, तू जिंकून कसा येतो, तेच पाहतो? आपल्या कार्यकर्त्याला असे कुणी बोलतात का? परिवार आहे तो आपला, आज माझ्यावर जी वेळ आली आहे, ती कुठल्याही परिवारावर येऊ नये. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही, असे अजित पवारांनी सांगितले.

राज्यात शिंदे गट आणि भाजपची सत्ता असतानाच रविवारी अचानक अजित पवारांनी आपल्या 9 आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेऊन, सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंत्रिमंडळाचा  विस्तार होईल आणि आपल्यालाही मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा लावून असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा हिरमोड झाला आहे. सत्तेत आणखी एक पक्ष वाटेदार झाल्याने मंत्री नसलेल्या आमदारांमध्ये नाराजी आहे. तर मंत्री असलेले आणि मंत्री नसलेले आमदार असे दोन गट शिंदे गटात पाहायला मिळत आहे. तर पक्षाच्या बैठकीत मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसलेल्या आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आधी मंत्री झालेल्या लोकांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणी देखील आमदारांनी बैठकीत केल्याची माहिती आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!