बुलढाणा जिल्ह्यात अवघा ५ टक्के पाऊस; जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट; राजकारणी सत्तेच्या खेळात मश्गुल!
– आज काही ठिकाणी भूरभूर; तर कमीअधिक पावसाची हजेरी!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. आज, उद्या येईल या आशेवर काहींनी पेरणी केली. जिल्ह्याचा विचार करता आजपर्यंत केवळ ४.९९ टक्के पाऊस पड़ला असून, केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊसच नसल्याने उगवलेले अंकुर जळत असून, दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातच महागाईने आणखी ड़ोके वर काढले आहे. तर दुसरीकडे, सत्ताधार्यांनी शेतकर्यांकडे पाठ फिरवली असून, जिल्ह्यातील झाडून सारे आमदार, खासदार सत्तेच्या ड़ाबड़ुबलीच्या खेळात रममाण झालेले आहेत. ‘आता आमचा वाली कोण?’, असा संतप्त प्रश्न शेतकरीवर्गातून उमटू लागला आहे.
हवामान खात्याने यावर्षीही समाधानकारक पाऊस येईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरीही आनंदी होता. कारण गेल्यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकर्यांना हाती आलेले पीक घेता आले नाही. त्यामुळे तो कर्जाच्या खाईत लोटला गेला, परंतु यावर्षी कसर काढू या हिमतीने त्याने बँकांनी हात आख़ुडता घेऊनही कर्ज काढून पेरणीची तजवीज केली. काही भागात थोड़ा पाऊस पड़ल्याने आणखी बरसेलच या विश्वासावर पेरणीही केली. महिना होत आला पण पाऊसच नसल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता, आजपर्यंत केवळ ३८ मिलीमीटर म्हणजे ४.९९ टक्के इतकाच पाऊस झाला असून, गेल्यावर्षी तोच आजपर्यंत १३७.२ मिलीमीटर इतका बरसला होता. जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन असून, आजपर्यंत ८८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. याचे प्रमाण केवळ शेकड़ा १२ टक्के इतकेच आहे.
येत्या ८ जुलैपर्यंत पावसात खंड़ असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला असल्याने सर्वदूर पाऊस पड़णार नाही. तसेही सोयाबीनची पेरणी २५ जुलैपर्यंत करता येते. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय व जमिनीत पुरेशी ओल गेल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये.
– मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा
———–
संग्रामपूर, चिखली, सिं राजा, जळगाव जामोद, खामगाव, शेगाव तालुक्यांसह इतर तालुक्यातील काही भाग, मेहकर तालुक्यातील थार, भोसा, नायगाव, दत्तापूर, देऊळगाव साकरशासह काही भागात काहींनी पेरणी केली, पण पाऊसच नसल्याने व काहीकड़े सिंचित पाण्याची सोय असूनही विहिरींनी तळ गाठल्याने पेरलेले उलटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस लांबल्याने आता उड़ीद, मूग पेरण्याची वेळ निघून गेली असून, शेतकर्यांची मदार फक्त काय ती सोयाबीनवरच आहे. एकीकडे, शेतमालाला मातीमोल भाव असताना बियाण्यांचे भाव मात्र अव्वाच्या सव्वा आहेत. त्यातच आता भाजीपाल्याच्या भावानेही चांगलीच उचल खाल्ली आहे. दहा रूपये किलो विकले जाणारे टमाटे दिड़शे रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. तथापि, या बाजारभावाचा शेतकर्यांपेक्षा व्यापारीवर्गालाच फायदा होत आहे. शिवाय, वाढत्या भावाने मिरची आणखी तिखट झाली आहे. तर कांदे, लसूणही ड़ोळयात पाणी आणत आहेत.
शेतकर्यांची दुर्देवी परिस्थिती राज्यकर्ते हे सर्व दुर्देवी चित्र उघ़ड्या डोळयांनी पाहत असताना, याकड़े ड़ोळेझाक करत सत्तेसाठीच्या खेळात रममाण झालेले दिसत असल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झालेले आहेत. गेल्यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले, पण मदत अजूनही मिळाली नाही. तर अवकाळीची मदतही वाट पाहून थकवत आहे. पेरण्या लांबल्याने शासनाने पर्यायी नियोजन करण्याची गरज असून, शेतकर्यांना हातभार लावणेही अवश्यक आहे.
———–