Head linesLONARMEHAKARVidharbha

लोणार तालुक्यात धो धो पाऊस; ओढ्याच्या पाण्यात बैलगाडी घसरली, तिघे शेतकरी वाहून गेले, दोघे बचावले!

लोणार (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यासह मेहकर, सिंदखेडराजा या तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू झाला असून, या पावसाने ओढे, नदीनाल्यांना पूर आला आहे. काल तालुक्यातील शिवणीजाट येथे गावाजवळील ओढ्यात बैलगाडीसह तिघे शेतकरी वाहून गेले होते. यापैकी एकाचा अद्यापही शोध लागला नव्हता. तर दोघे शेतकरी नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे चमू घटनास्थळी दाखल झाले असून, ते मृतदेहाचा शोध घेत आहेत. तर या दुर्देवी घटनेत एका बैलाचाही मृत्यू झाला आहे.

तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. शिवणीजाट येथे गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात शेतातून येत असलेल्या बैलगाडीसह तीन शेतकरी दुपारी तीन वाजेच्यादरम्यान वाहून गेले. यामध्ये केशव धनराज बरले (वय ५२), संतोष हरिभाऊ सरकटे (वय ४६) हे दोघे बचावले आहेत तर समाधान श्रीराम सरकटे (वय ४८), हे अजूनही बेपत्ता आहेत. आज त्यांचा पोलिस, महसूल विभागाचे पथक व आपत्ती व्यवस्थापनाचे चमू यांनी जोरदार शोध घेतला. परंतु, ते मिळून आले नाहीत. काल दुपारी जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर केशव धनराज बरले यांच्या शेतात कामासाठी गेलेले शेतकरी बैलगाडीने गावाकडे परत येत होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास गावाजवळील ओढ्याला पूर आला होता. या पुरातून येत असताना बैलाचा पाय घसरली, त्यात बैलगाडी घसरून वाहून गेली. त्यात तीन शेतकरीही वाहून गेले. यामध्ये संतोष सरकटे हे पोहून बाहेर आले तर केशव बरले हे झाडाच्या फांदीला अडकल्याने त्यांना गावकर्‍यांनी बाहेर काढले. तथापि, समाधान सरकटे हे बेपत्ता असून, आज दिवसभर शोध घेऊनही ते सापडले नाहीत. बैलगाडीचा एक बैलदेखील मृत्युमुखी पडला असून, एक बैल पोहून बाहेर आल्याने बचावला आहे.

या घटनेची माहिती मिळताच शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी तहसीलदार गिरीश जोशी यांना दूरध्वनीद्वारे घटना कळवली. त्यानंतर तहसीलदार गिरीश जोशी, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, नायब तहसीलदार रामकिसन डोळे, सहायक पोलिस निरीक्षक शरद अहेर, पोलीस उपनिरीक्षक सूरज काळे, मंडळ अधिकारी डव्हळे, तलाठी अशोक सौदर, तलाठी काशिनाथ इप्पर, विष्णू केंद्रे, तलाठी मंदार तनपुरे, बिट जमादार बन्सी पवार, कृष्णा निकम, संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेपत्ता शेतकर्‍याचा शोध सुरू केला. परंतु, ते मिळून आले नाहीत. दुसर्‍या दिवशीही शोध घेतला असता ते आढळले नाहीत. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. बळीराम मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना तालुका प्रमुख भगवान पाटील सुलताने, सरपंच चंद्रकांत बरले, प्रभाकर बरले, साहेबराव वाठोरे, सुनील सरकटे, राहुल सरकटे यांच्यासह शेकडो गावकरीदेखील शोध व मदतकार्यात सहभागी झाले होते.

सदर नाल्याजवळील जागा अंकुर सीड कंपनीने ताब्यात घेऊन पक्के तारफिनिशिंग केलेले आहे. त्यामुळे या नाल्यात गाळ, कचरा अडकून नाला तुंबला असून, त्यामुळेच पाणी अडकून पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्यात तीन शेतकरी वाहून गेले असून, दोघे बचावले असले तरी एकजण बेपत्ता आहे. या शेतकर्‍याचे काही बरेवाईट झाल्यास त्याला अंकुर सीडस कंपनी जबाबदार राहणार असून, याच कंपनीवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
– प्रा.बळीराम मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट)


बिबी परिसरात जोरदार पाऊस, शेतकरी खुश

दरम्यान, बिबी परिसरात दमदार पाऊस सुरू झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आनंदित होऊन कामाला लागला आहे. चार आणि पाच जुलै रोजी लोणार तालुक्यासह बिबी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली होती. खते, बियाणे, फवारणीसाठीचे तणनाशक औषध घेण्यासाठीची धावपळ दिसून येत आहे. मात्र पाऊस पडताच काही कृषी केंद्रांवर खते औषधीच्या किमतीत २० ते ५० रुपयांनी वाढ झाल्याचे शेतकर्‍यांकडून बोलल्या जात आहे .शेतकर्‍यांची लुबाडणूक होणार नाही याची संबंधित विभागाने काळजी घेणे गरजेचे असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!