काका-पुतण्यातील संघर्ष पेटला! शरद पवारांचा फोटो वापरण्यास अजितदादा गटाला मज्जाव!
– ‘माझ्या विचारांशी द्रोह करणार्यांना माझा फोटो वापरण्याचा अधिकार नाही’ – शरद पवारांनी ठणकावले!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – पवार काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष आता चांगलाच पेटला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुतणे तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपला फोटो वापरू नये, असे बजावले आहे. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, त्यांना माझा फोटो वापरण्याचा अधिकार नाही, असे शरद पवारांनी अजित पवारांना ठणकावले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज शरद पवारांची भेट घेऊन प्राप्त राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाविकास आघाडी अभेद्य असून, आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुटणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांनी पवारांना दिली. महाविकास आघाडीचे नेते लवकरच पवारांच्या नेतृत्वात राज्यव्यापी दौरा करणार असल्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले. तिकडे मातोश्रीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांची बैठक घेतली व निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. शिवसेना पक्ष शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नेते, पदाधिकारी, व कार्यकर्ते यांना सांगितले.
बंडखोर नेते अजित पवार व त्यांचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह, नाव व शरद पवारांचा फोटो वापरत असल्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा, हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, असा इशारा शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला आहे.
दुसरीकडे, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. यासंदर्भात नुकतीच काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीतील फुटीनंतरची रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, नसीम खान यांची उपस्थिती होती. या बैठकांनंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या दौर्याला उत्तर महाराष्ट्रातून लवकरच सुरुवात होणार असून, लोकशाहीविरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचीही बैठक मातोश्रीवर पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडी अभेद्य असल्याचे मान्य करण्यात आले. शरद पवार एकटे नाहीत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते मजबूत आहेत मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरेंसारखेच आहेत ते कधीही स्वतःला एकटे समजणार नाहीत, असे शिवसेनेच्या बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सांगितले.
‘पवारविरुद्ध पवार’, विधानसभा अध्यक्षांपुढे पेच!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी विधीमंडळासमोर धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे ७ ते ८ अर्ज दाखल झालेत. त्यातील याचिका आणि तक्रारअर्ज तपासल्यानंतर अध्यक्ष पुढची कार्यवाही करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. शिवसेना प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहून पुढची कार्यवाही करण्याचे विधीमंडळासमोर आव्हान आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भात पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि विरोधात अशा दुहेरी भूमिकेत असल्याने नवा पेच आहे. नेमका पक्ष कुणाचा? यावर निर्णय घेण्याचे अध्यक्षांसमोर आव्हान निर्माण झालेले आहे.
—————