– अॅड. बाळासाहेब आंबेडकर करणार नेतृत्व; सहभागी होण्याचे अशोक सोनोने यांचे आवाहन
खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील जवळजवळ ३५८ तालुक्यांतील महापालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील जवळजवळ २ लाख ४७ हजार गायरान अतिक्रमणधारकांना शासनाने नोटिसा बजावल्या असून, यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अतिक्रमण धारकांचादेखील समावेश आहे. कसलेली शेती व घरे डोळयादेखत उद्ध्वस्त होणार असल्याने अतिक्रमणधारक भयभीत झाले आहेत. परंतु, आपण काळजी करू नका, आपल्याला सदर जमिनीचे पट्टे मिळवून देऊ, असा धीर देत, यासाठी अतिक्रमणधारकांनी वंचित बहुजन आघाड़ीच्यावतीने २० जुलैरोजी अॅड़. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाड़ीचे पार्लमेन्टरी बोर्ड सदस्य तथा भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले आहे.
गायरान अतिक्रमणधारकांना पट्टे मिळवून देण्यासंदर्भात मुंबई येथे २० जुलै रोजी आयोजित मोर्चा संदर्भात माहिती देण्यासाठी खामगाव येथील बाजार समितीच्या टीएमसी यार्ड़मध्ये ३ जुलैरोजी आयोजित अतिक्रमणधारकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, वंचित बहुजन आघाड़ीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखा सावंग, ड़ॉ. अनिल अमलका, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, संचालक राजेश हेलोड़े, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेड़े, अमोल शेगोकार, दादाराव हेलोड़े, रमेश गवारगुर, प्रकाश दांड़गे, रत्नमाला गवई, बाळू मोरे, बाबूराव इंगोले, मनोहर जाधव यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या चाळीस वर्षापासून अतिक्रमीत जमीन आमच्याच ताब्यात असल्याने त्यावर आमचाच अधिकार असून, हा अधिकार आम्हाला अॅड़. बाळासाहेब आंबेडकर मिळवून देतील, असा ठाम विश्वास यावेळी वंचित बहुजन आघाड़ीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी व्यक्त केला. आजचे राजकारण पाहता, येणारा काळ वंचित बहुजन आघाडीसाठी सुवर्णकाळ असणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अतिक्रमण धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.