Breaking newsHead linesUncategorizedVidharbha

विदर्भातून शरद पवारांना धक्का; सहापैकी फक्त दोनच आमदार सोबत!

– चार आमदार अजित पवारांच्या गोटात; बहुतांश पदाधिकारी शरद पवारांसोबत राहणार!

नागपूर (खास प्रतिनिधी) – विदर्भातील सिंदखेडराजा-देऊळगावराजा (बुलढाणा) विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व काटोल (नागपूर)चे आमदार तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडापासून आ. देशमुख हे शरद पवारांसोबत सावलीसारखे सोबत आहेत. तर डॉ. शिंगणे यांनी ‘सिल्वर ओक’वर जाऊन आज सकाळी पवारांची भेट घेतली, व पुढील राजकीय रणनीतीबाबत चर्चा केली. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहापैकी चार आमदारांनी बंडखोर नेते अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातून फक्त दोन आमदार शरद पवारांच्या बाजूने उरल्याने पवारांना मोठा धक्का बसला आहे.

बंडखोर नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांची जी यादी दिली आहे, त्यामध्ये विदर्भातील पुसदचे आमदार नील नाईक, अकोल्यातील विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी, भंडाराचे आमदार राजू कारेमोरे आणि गोंदियाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे अजित पवारांसोबत गेले आहेत. या शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके हे मुंबईत अजित पवारांसोबत होते. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते विजय देशमुख हे शपथविधी सोहळ्याला हजर होते. विदर्भातून डॉ. राजेंद्र शिंगणे व अनिल देशमुख या शरद पवारांच्या दोन शिलेदारांनी मात्र आपली निष्ठा कायम ठेवली असून, नागपूरचे माजी आमदार रमेश बंगदेखील शरद पवारांसोबत आहेत. डॉ. शिंगणे हे गेल्या काही दिवसांपासून सहकुटुंब फिरायला गेले होते. काल ते मुंबईत परतले व आज सकाळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ. शिंगणे यांचाच शब्द चालत असल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीदेखील शरद पवार व डॉ. शिंगणे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुलढाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अभंग आहे.


शरद पवारांसोबत उरले १५ आमदार; अजितदादांकडे २० आमदार, बाकी तठस्थ

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत १५ आमदार असल्याचे दिसून येत असून, त्यात – जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष), जितेंद्र आव्हाड (विधिमंडळ गटनेते), डॉ. राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, संदीप क्षीरसागर, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, मकरंद जाधव, अतुल बेनके, शशिकांत शिंदे, मानसिंग नाईक, सुमन पाटील, दौलत दरोडा, राजू नवघरे व रोहित पवार हे आहेत. तर अजितदादा पवारांसोबत २० आमदार असल्याचे दिसून येत असून, त्यात मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांच्यासह अनिल भाईदास पाटील, बबनदादा शिंदे, यशवंत माने, नितीन पवार, शेखर निकम, नीलेश लंके, मनोहर चांद्रिकापुरे, राजू कारेमोरे, नरहरी झिरवळ, सरोज आहिरे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर व इंद्रनील नाईक यांचा समावेश आहे. तर जे आमदार तठस्थ आहेत, त्यांच्यामध्ये – किरण लहामटे (शपथविधीला उपस्थितीत), संग्राम जगताप (शपथविधीला उपस्थित), सुनिल टिंगरे (शपथविधीला हजर), राजेश टोपे, संजय शिंदे, आशुतोष काळे (परदेशात), सुनिल भुसारा, दिलीप मोहिते, अशोक पवार, दत्ता भरणे, सुनिल शेळके, अण्णा बनसोडे, चेतन तुपे, प्रकाश सोळंखे, बाळासाहेब आजबे, दीपक चव्हाण, राजेश पाटील हे आमदार तठस्थ असून, अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. तथापि, आ. राजेश टोपे यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!