खामगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाण्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे बेपत्ता असल्याची तक्रार सत्याग्रह शेतकरी संघटनेकडून खामगाव पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पालकमंत्री झाल्यापासून गुलाबराव पाटील हे क्वचित जिल्ह्यात आले असून, जिल्ह्याचा सर्व कारभार हा जिल्हाधिकारी व प्रशासनाच्याच हातात आहे. त्यामुळे जिल्हावासीयांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालकमंत्री जिल्ह्यात येत नसल्याने हे महत्वाचे व जबाबदारीचे पद केवळ शोभेचे बनले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आतापर्यंत फक्त तीनवेळा जिल्ह्यात आलेत, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीने शेतकरी खचला तरी ते जिल्ह्यात आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना शोधावे व शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खामगाव पोलिसांत दाखल तक्रारीतून सत्याग्रह शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. गारपिटीचे पैसे नाहीत, पीकविम्याचे पैसे नाहीत, बँका शेतकर्यांना कर्ज देत नाहीत, खरिपाचे नियोजन नाही, हजारो क्विंटल कांदा सडला, शेतकर्यांना कुणाचा आधार नाही, शेतकर्यांची दुर्दशा पहायला पालकमंत्री येथे आलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे पालकमंत्रीपद बरखास्त करावे, किंवा जिल्ह्याला दुसरे पालकमंत्री द्यावे, अशी मागणीही सत्याग्रह शेतकरी संघटनेने केली आहे.
पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे लागले होते पोस्टर्स!
बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लागले होते. अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकरी उद््ध्वस्त झालेला असताना, पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले नाहीत, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्री बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले होते. या पोस्टरवर पालकमंत्र्यांना शोधून देणार्यास ५१ रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असेही नमूद होते. या पोस्टरची जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती.
————–