– अवैध दारूविक्री बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या चिखली तालुक्यातील काटोडा येथील अवैध दारूविक्री विरोधात नारी शक्तीने रौद्रावतार धारण केला असून, मागील निवेदने ठाणेदार अंढेरा व पोलीस अधीक्षक यांच्याकडून दुर्लक्षित केल्यामुळे महिला संतप्त होऊन आज, दि. १९जून रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा व ठाणेदार अंढेरा यांना महिलांनी निवेदन सादर करून अवैध दारूच्या त्रासाची आपबिती कथन केली. तसेच, ही अवैध दारूविक्री बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारादेखील निवेदनाद्वारे दिला आहे.
अंढेरा पोलिस ठाणेहद्दीतील काटोडा गावात अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे महिलावर्ग त्रस्त आहे. त्यामुळे आज, दिनांक १९ जून रोजी अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी २५ ते ३० महिलांचा ताफा सरपंच पतीसह, तंटामुक्ती अध्यक्ष, जिल्हा दारूबंदी समन्वयक यांच्या उपस्थितीत, मागील निवेदने देऊनही ठाणेदार अंढेरा व पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केली नसल्याने संतप्त होऊन, सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनमध्ये धडकला. त्यांनी अवैध दारूविक्री व गावातील चौघा दारूविक्रेत्यांना काही पोलिस देत असलेल्या अभयावरून उपस्थित पोलिस अधिकार्यांना धारेवर धरले. दारूमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून, चाळीस युवक मृत्युमुखी पडले आहेत. महिलांना विधवा व्हावे लागले असून, तरुण मुले व्यसनाधीन झाली आहेत, युवापिढी बरबाद होत आहे. तसेच ३१ मे रोजी अडव्होकेट निलकुमार बंगाळे यांनी निवेदन देऊन अवैध दारू बंद करण्याची मागणी केली होती, तीसुद्धा दुर्लक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे या महिला आणखीच संतप्त झाल्याचे दिसून आले. यावेळी महिलांनी अवैध दारू काटोडा गावातून हद्दपार करण्याची मागणी केली असून, दारूविक्री करणारे यांना तडीपार करावे, अन्यथा पाच दिवसांनंतर उपोषणाचा मार्ग अवलंबविला जाईल, असा इशारा या संतप्त महिलांनी दिला.
या महिलांनी बुलढाणा येथे जात पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनादेखील निवेदन देत, अवैध दारूचा मुद्दा किती गंभीर आहे, हे पटवून दिले. त्यानंतर महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी यांच्याकडे वळवा व जिल्हाधिकारी यांनादेखील गावातील अवैध दारू बंद करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी काटोडा येथील महिला व पुरुष हे दारू बंद न झाल्यास अंढेरा पोलिस स्टेशन समोर उपोषण करणार आहे व त्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी महिलांना दिले आहे, असे महिलांनी सांगितले. त्यामुळे दारूबंदीचा प्रश्न पेटला असल्याने अंढेरा पोलिस ठाणे काटोडा गावातील दारू विक्री बंद करणार काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावेळी सरपंचपती प्रदीप थिंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष राजू लहाने, अॅडव्होकेट तथा जिल्हा समन्वयक दारुबंदी समितीचे निलकुमार बंगाळे, अंजु खरात, रुख्मीना धुड, लक्ष्मीबाई लहाने, विमल पैठणे, विश्रांती पैठणे, कांताबाई लहाने, सुमन धुड, गीता मेव्हणकर, शिला बनकर, सुभन पैठणे, वंदना लहाने, सरला टवलारकर, सविता थिंगळे, उर्मिला थिंगळे, गजानन थिंगळे, राजेंद्र लहाने, दत्तात्रय लहाने, सतिष धुड, विष्णू मेव्हणकर, दत्ता लहाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
————-