– बिबी येथे शांतता समितीची बैठक; तरूणवर्गासह ग्रामस्थांना केले मार्गदर्शन
बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – सोशल मीडिया एकमेकांशी संपर्काचे वेगवान माध्यम असले तरी, काही समाजविघातक प्रवृत्ती त्याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह, समाजघातक पोस्ट शेअर करत असेल तर पोलिस त्याच्यावर कठोर कारवाई करेल, त्याला तुरूंगात धाडले जाईल, असा खणखणीत इशारा बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी दिला. बिबी पोलिस ठाण्याच्यावतीने व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेवरून घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. येथील गणपती मंदिर परिसरात ही बैठक पार पडली. बैठकीला ग्रामस्थांसह तरुणवर्गाची मोठी उपस्थिती होती.
ठाणेदार सोनकांबळे म्हणाले, की यापुढे तरुणपिढीने मोबाईल वापरत असताना फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, व्हिडिओ, मेसेज काळजीपूर्वक विचार करून फॉरवर्ड करावा. जेणेकरून मोबाईलवरील आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही समाजाच्या भावना दुखणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आक्षेपार्ह मजकूर, व्हिडिओ, पोस्ट हे शेअर करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, तुरुंगवासाची शिक्षा कायद्यामध्ये आहे, तसेच काही आक्षेपार्ह पोस्टबाबत माहिती मिळताच पोलिसांना कळवावे. तसेच यापुढे हिंदू, मुस्लिम बांधवांचे सण, आषाढी एकादशी, बकरी ईद आहे ते सण जातीय सलोखा कायम ठेवून सर्व धर्म समभाव मानून आनंदात, उत्साहात साजरे होतील, याची काळजी घ्यावी. आणि, पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी केले आहे.
यावेळी सरपंचपुत्र दीपक गुलमोहर, भास्कर खुळे उपसरपंच, संदीप बनकर ग्रामपंचायत सदस्य, विठ्ठल आटोळे तंटामुक्ती अध्यक्ष, रियाज भाई उपाध्यक्ष, दासू ईवरे, मापारी पोलीस, ग्रामस्थ, मान्यवर, पदाधिकारी, पत्रकार, तरुण मंडळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————–