Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या, बळीराजा धास्तावला!

– मृगातच पडला तरच पीके जोमदार; मृग कोरडे गेल्याने ‘टेन्शन’ वाढले!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – मोसमी पाऊस लांबल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीची कामे जवळजवळ आटोपली असून, शेतकरी खते, बियाण्यांच्या सोयीसाठी धावाधाव करताना दिसत आहे. आधीच समस्यांचा ड़ोंगर चढत असताना आता पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत आणखी भर पड़ली आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची मंजूर झालेली मदत अद्यापही शेतकर्‍यांना मिळाली नसताना पेरणीच्या तोंड़ावरच पीकविमा मिळाल्याने काही प्रमाणात मात्र आधार झाला आहे.

मे महिन्यात लागणार्‍या रोहिणी नक्षत्रात कधी कधी तुफान पाऊस पड़तो. त्यामुळे शेतीकामांना वेग येतो तर ७ जूनपासून सुरू होणार्‍या मृगनक्षत्रात साधारणतः दुसर्‍या आठवड्यात पेरणीला सुरूवात होते. परंतु या हंगामात रोहिणी नक्षत्र पूर्णतः कोरड़े गेले असून मृग नक्षत्रही दोन दिवसाने संपत असून, तेही कोरड़े जाण्याचा ठाम अंदाज आहे. उलट ऊन्हाळयापेक्षाही जास्त आग सूर्य ओकत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीने हातचे पीक गेले, उन्हाळयात जिल्ह्यात अवकाळी पावसाने धूम केल्याने गव्ह, हरभरा, फळबागा, टरबूजसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या आक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी व गेल्या मार्च व एप्रिल महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत मंजूर झाली. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन व जोरदार पाठपुरावा, तसेच मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांचाही पाठपुरावा, या एकत्रित प्रयत्नामुळे जिल्ह्यासह मेहकर, लोणार तालुक्यासाठीसुध्दा आर्थिक मदत मंजूर झाली. पण अद्यापही सदर मदत शेतकर्‍यांना मिळाली नाही.

याबाबत जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागात चौकशी केली असता, सदर मदत मुंबई येथील संबंधित कार्यालयातून परस्पर शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येते, असे सांगण्यात आले . मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, चिखली तालुक्यातील मिसाळवाडीसह नजीकची गावे या भागात मार्च व एप्रिलमध्ये अवकाळी पावसामुळे टरबूज, कांदा तसेच फळबागाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये मेहकर तालुक्यात ११२ हेक्टर नुकसानीसाठीची मदत मिळणार आहे. यासाठी तत्कालीन तहसीदार संजय गरकल यांची तत्परता व तलाठी तुळशिदास काटे यांची धावपळ कामी आली. तर या भागाचे आ. संजय रायमुलकर यांनीही नुकसानीची पाहणी करत मदत मिळवून देण्याची हमी दिली होती. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील तातडीने वृत्त प्रसारित करून शासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाने पीकविम्याचे पैसे शेतकर्‍यांना मिळाल्याने पेरणीच्या तोंड़ावर काही प्रमाणात का होईना, आधार झाला आहे, असे शेतकरी सांगतात. तर श्रेयवादाच्या लढाईत शेतकरी भरड़ला जावू नये, याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
मृग नक्षत्रात पाऊस झाल्यानंतर यावेळी पेरणीची लगबग असते, पण आता शेतकरी आभाळाकड़े आशाळभूत नजरेने पाहतो आहे. संकटांमागून संकटे झेलत त्रस्त झालेला शेतकरी आता पाऊस नसल्याने नैसर्गिक संकटाचाही सामना करताना दिसत आहे. यामुळेच की काय, आपला कोणी वालीच नसल्याचा ठाम विश्वास बळीराजाचा झाला आहे. आणखी आठ दिवस तरी पाऊस नसल्याचे हवामान अभ्यासक सांगतात, तर हवामान खात्याने उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे सांगितले असून, जमिनीत वीतभर ओल गेल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. एकंदरित पावसाची सध्यातरी शाश्वती नसल्याने व आणखी पाऊस लांबल्यास पीक पध्दतीत बदल करावा लागणार असल्याचे जाणकार सांगतात.

गेल्या आठवड्यात एक दिवस मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरात अर्धा तास पाऊस पड़ल्याने शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली होती. पण आता पाऊस नसल्याने बियाणे घेण्यासाठी कोणी फिरकत नसल्याचे येथील कृषी बियाणे विक्रेते नामदेव साळसुंदर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


खते, बियाणे खरेदीसाठी धावाधाव; कपाशीची मान्सूनपूर्व लागवड धोक्यात!

पाऊस नसल्याने पेरण्या लांबणार असून, याचा परिणाम उत्पादनावर होतो. मृगात झालेली पेरणी केव्हाही फायद्याची असते, असा ठाम विश्वास शेतकर्‍यांचा आहे. जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यासह काही भागात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड़ झाली असून, पाऊस नसल्याने जंगली जनावरे कोवळे अंकुर फस्त करीत आहेत. शेतीमशागतीची कामे जवळजवळ आटोपली असून, खते, बियाण्यांसाठी धावाधाव शेतकरी करताना दिसत आहे. पीककर्ज वेळेवर मिळत नसल्याची शाश्वती आल्याने प्रसंगी काहींना सावकाराचे दारही ठोठावे लागत आहे. एकीकडे शेतमालाला भाव नसताना बियाण्याचे भाव मात्र गगनाला भिड़ले आहेत तर जिल्ह्यात काही भागात चढ्याभावाने बियाणे विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत कृषी विभागाने आणखी अ‍ॅलर्ट होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!