बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलडाणा अर्बन परिवार व सकल राजस्थानी समाजाने सामाजाच्या संकटसमयी नेहमीचं दातृत्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनासारखे महाभयंकर संकट असो की, नैसर्गिक आपदा, प्रत्येक संकटकाळी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून बुलडाणा अर्बनचे सोशल सेल नेहमीचं सर्वांच्या पुढे असते. याचं सामाजिक बांधीलकीतून आता शहरात कोणाकडे एखादी दुदैवी घटना घडली अथवा मृत्यू झाल्यास घरातील लोक व त्यांच्या नातेवाईकांची भोजन व्यवस्था केली जाणार असून, ५० लोकांचे भोजन ज्यात पिठलं, भात, पोळी असा टिफीन घरपोच देण्यात येईल. भोजन पोहोचविण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहील. या संदर्भात बुलडाणा अर्बन सोशल सर्व्हिसेस, समृध्दी अपार्टमेंट, जेल रोड, बुलडाणा येथे शैलेश कुळकर्णी मोबाईल क्र. ९४२३१४४७३७ व संतोष डुकरे मोबाईल क्र.८८८८३३३९६४ वर संपर्क साधून पूर्वसूचना द्यावी, असे आवाहन बुलडाणा परिवार व सकल राजस्थानी समाज बुलडाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
बुलडाणा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे, परंतु ते कायमच दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे गावाचा जिल्ह्याचे ठिकाण म्हणून व्हावा, तसा विकास झालेला नाही, परंतु अलीकडच्या काळात आसपासच्या गावामधील लोक शहरात मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने व रोजगाराच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास आल्यामुळे शहराची लोकसंख्या आज वाढलेली आहे. शहराची लोकसंख्या जरी वाढलेली असली तरी एकत्र कुटूंब पध्दतीची जागा एकलकुटुंब पद्धतीने घेतली आहे आणि अशातच जर एखाद्या कुटुंबात जर काही दुदैवी घटना घडली तर सर्व सोपस्कार पूर्वी नातेवाईक किंवा अगदी जवळचे मित्र मंडळी पार पाडत. परंतु अलिकडच्या काळात तसे दिसून येत नाही, कारण आम्हीच तसे राहिलो नाही. त्यामुळेच सर्व सोपस्कार आता शेजारी किंवा मित्र मंडळींना पार पाडावे लागतात. अशा प्रसंगी सामाजिक बांधिलकीचे भान बाळगणे फार गरजेचे आहे. नेमके तेचं भान बाळगूण बुलडाणा अर्बन परिवाराने हा उपक्रम सुरू केला आहे.