भानखेडमध्ये गर्भवती महिलेसह 2 मुलांचा मृत्यू
चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली शहरासह तालुक्यात डेंग्युसदृश आजाराचा उद्रेक झाला असून, आरोग्य विभाग मात्र गाढ झोपेत आहे. या आजाराचे अनेक रूग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत असताना, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे मात्र याबाबतची पुरेशी आकडेवारी नाही, असे निदर्शनास आले आहे. प्राप्त माहितीनुसार, डेंग्युसदृश आजाराने आतापर्यंत चार बळी गेले असून, अनेक रूग्ण गंभीर अवस्थेत आहेत. जिल्हाधिकारी यांनी स्वतः याप्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. भानखेड आणि सवना गावात अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. तापामुळे आतापर्यंत दोन मुलांसह एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने भानखेड गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चिखली तालुक्यासह, शहरात डेंग्यू, मलेरिया, हिवताप थैमान घातले असून, शहरातील विविध खाजगी दवाखान्यात डेंग्यूचे रुग्ण दाखल आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. डेंग्यूसदृश आजाराने तालुक्यांतील भानखेड येथील दोन बालके आणि एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरातील गजानन नगर येथील एका १४ वर्षीय मुलाचादेखील मृत्यू १५ जून रोजी झाला असून, मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. तरी चिखली तालुका आरोग्य विभाग आणि चिखली नगरपालिका आरोग्य विभाग यांनी तातडीने डेंग्यू, मलेरिया आणि हिवताप आजाराच्या प्रतिबंधाकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुकावासीय करत आहेत.
भानखेड येथे गेल्या तीन आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य तापाची लागण लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना झाली आहे. आतापर्यंत रुग्णाचा आकडा ५० पर्यंत गेल्याची माहिती आहे. यातील काही रुग्ण बरे झाले आहेत. उपचार सुरू असताना गुरूवारी (१५ जून) कांचन तारु या २३ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या आठवड्यातही दोन लहान मुलांचा अशाच तापाने मृत्यू झाला होता.
तातडीने उपाययोजना करा – डीपीआयची मागणी
चिखली तालुक्यासह, शहरात डेंग्यूने थैमान घातले असून, शहरातील अनेक खाजगी दवाखान्यात डेंग्यूचे रुग्ण दाखल आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तरी प्रशासनाने डेंग्यू, मलेरिया आणि हिवताप आजाराच्या प्रतिबंधाकरिता तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे विदर्भ युवक अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हाध्यक्ष दिलीप काळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे विदर्भ युवक अध्यक्ष भाई छोटू कांबळे, बुलढाणा युवक जिल्हाध्यक्ष दिलीप काळे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा साळवे, स्वप्नील जाधव, आनंद गोफने, सागर कांबळे, अक्षय पवार, शेख सलमान यांच्या स्वाक्षर्या आहेत. तातडीने उपाययोजना न केल्यास आरोग्य कार्यालयाला कुलुप ठोकू, असा इशारादेखील निवेदनाच्या शेवटी दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी न. प. मुख्यधिकारी आणि पं.स. गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या.