शिवसेनेच्या फायरब्रॅण्ड नेत्या अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्यात हल्ला!
मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सोशल मीडियाप्रमुख व फायर ब्रॅण्ड नेत्या अयोध्या पौळ यांना फसवून ठाणेनजीक कळव्यात नेत, शाईफेक करत मारहाण करण्यात आली. काल (१६ जून) एका कार्यक्रमात हा हल्ला करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या आधी हार का घातला नाही, हे निमित्त करत पौळ यांना मारहाण करण्यात आल्याचे अयोध्या पौळ यांनी मीडियाला सांगितले. हे एक मोठे षडयंत्र होते, असेही त्या म्हणाल्या.
या मारहाणप्रकरणी अयोध्या पौळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावर ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ठाण्यातील कळवा येथे ठाकरे गटाच्या कार्यक्रमाचा बनाव करून मला या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. इथे आल्यावर हा कार्यक्रम आपल्या गटाचा नसल्याची मला शंका आली. पण कार्यक्रमातून निघणे योग्य नसल्याने मी थांबले. मला महापुरुषांच्या प्रतिमांना हार घालण्यास सांगण्यात आले. मी महापुरुषांना हार घातले. त्यावेळी एक महिला आली आणि तिने मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा माझ्यावर आरोप केला. बाबासाहेबांच्या प्रतिमेला इतर महापुरुषांच्या आधी का हार घातला नाही, असे या महिला म्हणत होत्या. मी त्यांना सांगितले, की मी आधी छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर अहिल्यादेवी होळकर आणि नंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घातला आहे. हे सर्व महापुरूष आहेत. तरीदेखील या महिलांनी तोंडावर शाई फेकत चापट व बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला आहे.
तर याबाबत शिवसेना (ठाकरे) गटाचे नेते केदार दिघे म्हणाले, की ‘मला वाटतं, हे षडयंत्र आहे. अयोध्या पौळ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलखोल करत असतात. पक्षाचा कार्यक्रम असल्याचे सांगून पौळ यांना बोलवण्यात आले. तिथे आल्यावर आपल्या पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे पौळ यांच्या लक्षात आले. नंतर नको त्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, हे दुर्दैवी आहे,’ असं केदार दिघे म्हणाले.
मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे #संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा #शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन… pic.twitter.com/YKMQWbiFAr
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) June 17, 2023