– सातवर्षीय मुलीला डेंग्यु, खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची वेळ
– परिसरात डेंग्युच्या साथीची भीती, तर सरकारी यंत्रणा झोपलेली!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – मेरा बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वांझोटे ठरले असून, येथे कायमस्वरुपी डॉक्टरच नसल्याने गोरगरीब रूग्णांना खासगी दवाखाना गाठावा लागत आहे, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. आतादेखील सातवर्षीय बालिकेला डेंग्यु झाला असून, या आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने तिला खासगी दवाखान्यात भरती करावे लागले. या उपकेंद्रात तातडीने डॉक्टर व वैद्यकीय सोयीसुविधा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने अनेक रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह काँग्रेस पक्षाचे चिखली तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पडघान यांनी आज, दिनांक १६ जूनरोजी ग्रामस्थांना घेऊन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे अचानक भेट दिली असता, दवाखान्यात औषध निर्मिती अधिकारी खरात यांच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणतीही कर्मचारी आढळून आला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर पडघान हे चांगलेच आक्रमक झाले. मेरा बुद्रुकची लोकसंख्या सरासरी १३०० ते १५०० पर्यंत असल्याने तेथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोणतीही वैद्यकीय अधिकारी नसल्याचे अनेक रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाण्याची वेळ येत आहे.
खाजगी दवाखान्यात जाऊन रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दोन दिवसाअगोदर सातवर्षीय मुलीला डेंग्युची लागण झाल्याने तिला बुलढाणा येथील खाजगी दवाखान्यात न्यावे लागले. तिथे तिच्यावर उपचार आहे. असे असताना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोणतीही डॉक्टर नसल्याचे आढळून आल्याने मेरा बुद्रुक ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रुग्णासह काँग्रेस पक्षाचे चिखली तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पडघान, खुशालराव पडघान, रमेश टेटवार, दगडू पडघान, पत्रकार सुनील अंभोरे, प्रताप मोरे, कैलास आंधळे, प्रदीप साहेबराव जाधव, दिलीप कुसळकर, अशोक सुरूशे, संदीप साहेबराव जाधव, अंबरसिंग वायाळ, रामेश्वर गायकवाड, बबन चेके, सिद्धार्थ डोंगरदिवे, काळुबा तोडे, शारदा लहाने आदी उपस्थित होते.