ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब खेडकर यांच्यावर पोलिस दूरक्षेत्रातच खासगी व्यक्तीचा हल्ला!
– शेवगाव तालुका पत्रकारांसह जिल्हाभरातून तीव्र निषेध, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी
नगर (जिल्हा प्रतिनिधी) – शेवगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व ब्रेकिंग महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी बाळासाहेब खेडकर यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला चढवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, शेवगाव पोलिस दूरक्षेत्राच्या आवारात व तेथे उपस्थित पोलिस कर्मचार्यासमोरच हा प्रकार घडल्याने या घटनेचा शेवगाव तालुक्यातील पत्रकारांसह जिल्हाभरातील पत्रकारांनी तीव्र निषेध केला आहे. मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी याबाबत तातडीने पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधत, संबंधित आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली असून, संबंधित पोलिस कर्मचार्यावरही कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादक पुरूषोत्तम सांगळे यांनीही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली नाही, तर आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल करू, असा इशारा नगर पोलिसांना दिला आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब खेडकर यांना झालेल्या मारहाणप्रकरणी आरोपी दीपक भीमराव तागडे याच्याविरोधात पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ चे कलम ३ व ४ प्रमाणे तसेच, भारतीय दंडविधानाच्या ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार गुरुवारी (दि.१५) रात्री नऊ वाजेच्या सुमारास बोधेगाव ता.शेवगाव येथील पोलीस दूरक्षेत्रात घडला. पत्रकार सुरक्षा कायदा अन्वये तालुक्यात प्रथमच असा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पत्रकार बाळासाहेब अंबादास खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
श्री.खेडकर हे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोरून जात असताना दूरक्षेत्राच्या आवारात लोकांची गर्दी दिसली, म्हणून ही गर्दी कशाची आहे, हे पाहण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी एका खाजगी व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम सुरु होता. तेथे पोलिस नाईक संतोष धोत्रे हेही उपस्थित होते. पत्रकार खेडकर यांना तेथे पाहताच दीपक भीमराव तागडे याने ‘तू पत्रकार येथे कशाला आलास, तू बाहेर हो’ असे म्हणत त्यांची गचांडी धरून तोंडात मारले, व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, ‘परत जर येथे थांबलास तर तुझे हातपाय तोडून जीवे मारून टाकू’, अशी धमकी दिली. पोलीस कर्मचारी संतोष धोत्रे यांच्यासमोर व पोलीस दूरक्षेत्रात हा गंभीर प्रकार घडला. या घटनेने शेवगाव तालुक्यातील पत्रकारांमध्ये एकच खळबळ उडाली. तालुक्यातील पत्रकारांनी याबाबत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची भेट घेऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. तसेच, आरोपीविरोधात तातडीने गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली. आता या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत.