– मेहकर सायबर पोलिसांकडून कसून तपास सुरू!
मेहकर (अनिल मंजुळकर) – मेहकर येथील प्रसिद्ध मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य महाविद्यालयाची वेबसाईट (https://mesaccollege.org/cgi-sys/suspendedpage.cgi) अज्ञात हॅकर्सनी हॅक करून त्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ व ‘पाकिस्तानचा झेंडा’ टाकल्याने एकच खळबळ उडाली होती. बुलढाणा सायबर पोलिसांनी तातडीने हालचाली करत, हा वादग्रस्त व आक्षेपार्ह मजकूर हटविला. याप्रकरणी मेहकर पोलिसांत अज्ञात हॅकर्सविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर असे, की मेहकर एज्युकेशन सोसायटी (एमईएस)च्या कला, वाणिज्य महाविद्यालयाची वेबसाईट आज, दि. १६ जूनरोजी अज्ञात व्यक्तीने हॅक करून त्यावर पाकिस्तान जिंदाबाद व पाकिस्तानचा झेंडा टाकल्याने एकच खळबळ उडाली. मेहकर पोलिसांच्या सायबर सुरक्षा विभागाने तात्काळ ही वेबसाईट बंद केली. पोलीस विभागाच्या सायबर पेट्रोलिंग विभागाला ही वेबसाईट हॅक झाल्याचे समजताच त्यांनी मेहकर पोलिसला कळवले.
पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी या तात्काळ आज दुपारी मे.ए.सो.महाविद्यालयात आल्या. प्राचार्य डॉ.गणेश परिहार यांना कल्पना देऊन वेबसाईट तपासली असता, त्यावर पाकिस्तान जिंदाबाद लिहिलेले व पाकिस्तानचा झेंडा दिसत होता. त्यानंतर डेव्हलपरला (अमरावती) संपर्क साधून ही वेबसाइट आता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, काही जणांच्या फेसबुकवरसुद्धा याचे स्क्रीन शॉट व्हायरल होत असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.