– जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर तहसीलदार मासाळ `अॅक्शन` मोडमध्ये!
वर्धा (प्रकाश कथले) – अवैधपणे केलेल्या वाळूसाठ्यावर कारवाई करुन साठा जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे. त्यानुसार ठिकठिकाणी अवैध वाळूसाठ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून, हिंगणघाट येथे पुन्हा ठिकठिकाणी छापे टाकून तब्बल ६८४ ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ तसेच त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. हिंगणघाट येथील मोहता मिल परिसरातील कारवाईनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ठिकठिकाणी अवैध वाळूसाठ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्याप्रमाणे अवैध वाळूसाठ्यावर ही कारवाईची मोहीम सुरू झाली आहे.
हिंगणघाट येथील महसूलचे काही वाळू व्यावसाय़िकांसोबत संपर्कात होते. त्यातून कारवाई होत नव्हती. नागपूरच्या फेर्या वाढायला लागल्या होत्या. भोजनालयातील सामिष जेवणाचे ताट वारंवार सजविले जात होते. यांची मात्र आता जिल्हाधिकार्यांनी थेट कारवाई सुरू केल्याने चांगलीच अडचण झाली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मासाळ इन अॅक्शनमध्ये आल्याचे दिसत आहे. हिंगणघाट येथे पहिल्या कारवाईत २०० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला होता. हा साठा हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या परिसरात जमा करण्यात आला आहे. नव्याने ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये पुन्हा तब्बल ६८४ ब्रास वाळूसाठा मिळाला. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार सागर कांबळे, मंडळ अधिकारी डी.आय.हेमणे, विलास राऊत, संजय नासरे, तलाठी सतीश झारे, रामकृष्ण घवघवे, गजानन ठाकरे, श्रीकांत राऊत, कोमल ढोबळे यांनी केली.
पथकाने केलेल्या कारवाईत डंकीन, कवडघाट या परिसरातून १६० ब्रास वाळूसाठा जप्त करुन ती हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली. मौजा हडस्ती येथे देखील २३० ब्रास, मौजा धोच्ची येथे ३० ब्रास, मौजा साती येथे ४५ ब्रास, शेकापूर मोझरी येथे २० ब्रास, पोहणा येथील सूतगिरणी परिसरात ४० ब्रास, कापसी आणि नांद्रा येथे प्रत्येकी १२ ब्रास, कवडघाट येथे वर्धा नागरी सहकारी पतसंस्था मर्या हिंगणघाटच्या परिसरात १३५ ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. अवैध वाळूसाठा प्रकरणी या बँकेस नोटीस बजावण्यात आली आहे. हा सर्व साठा जप्त करुन तहसील प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतला आहे. ही वाळू शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हिंगणघाट येथे अवैध वाळूसाठ्यावर सलग दुसरी ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अवैध वाळूसाठ्याची माहिती द्या…!
जिल्ह्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूसाठा आढळून आला आहे. अन्य ठिकाणी देखील असा साठा असण्याची शक्यता आहे. तहसीलदारांना या साठ्यांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांना असा साठा आढळून आल्यास त्यांनी ८३२९७ ५०३४२ या व्हाट्सॅप क्रमांकावर संदेश पाठवून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
—–