जाहीर कीर्तनातून पुत्रप्राप्तीचा सल्ला देणे भोवले; इंदुरीकरांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश!
UPDATE : इंदुरीकरांना तूर्त दिलासा…
लिंगाभेदाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या इंदुरीकरांना औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला. त्यांच्यावर ४ आठवडे गुन्हा दाखल करण्यास मनाई केली. पुढील चार आठवड्यात सुप्रीम कोर्टात जाणार असून, तोपर्यंत गुन्हा दाखल करू नये, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – आपल्या शिवराळ कीर्तनामुळे कायम चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत. ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे बाष्पळ वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनात केले होते. हे वक्तव्यच त्यांना भोवले आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे यांनी अॅड. जितेंद्र पाटील यांच्यासह औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हे आदेश दिलेत.
याबाबत सविस्तर असे, की संगमनेर सत्र न्यायालयाने इंदुरीकरांना या प्रकरणात दिलासा दिला होता. गुन्हा दाखल करू नका, असे म्हटले होते. सत्र न्यायालयाचा तो निकाल औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. त्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल होईल. इंदुरीकर महाराज यांनी वादग्रस्त व लिंगभेदाबाबत विधान केल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या कीर्तनाचे व्हीडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. तेच पुरावे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सादर केले होते. न्यायालयाने इंदुरीकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. हा गुन्हा रद्द करावा म्हणून इंदुरीकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती, सत्र न्यायालयाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले. त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
‘इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. इंदुरीकरांचे ते वक्तव्य समाजाचे स्वास्थ्य बिघडवणारे आहे. कायद्याच्याविरोधात आहेत. त्याविरोधात आपला लढा आहे आणि त्याला आता यश आले आहे.’
– अॅड. रंजना गवांदे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
—————–