मेहकर (अनिल मंजुळकर) – हिवरा आश्रम येथील शुभम अवचार यांच्या टायर्स व ऑटो पार्टच्या दुकानावा आज १० जून रोजी अचानक भीषण आग लागली. या आगीत वाहनांच्या ऑटो पार्टचे साहित्य जळून खाक झाले. या दुर्देवी घटनेत सुमारे २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असे सांगितले जाते.
हिवरा आश्रम परिसरातील ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद थुट्टे हे मॉर्निग वॉकला जात असतांना त्यांच्या घराशेजारी असलेल्या शुभम सर्व्हिसिंग सेंटरमधून आगीचे लोट उसळतांना दिसले. त्यांनी लगेच दुकानचे मालक, शेजारील नागरिक व प्रशासनाशी संपर्क करून अग्निशामन यंत्र बोलवले. या कामात त्यांना मेहकरचे माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय वडतकर, ज्येष्ठ पत्रकार सिध्देश्वर पवार, नीलेश नाहटा, समाधान म्हस्के यांनीही मोलाची मदत केली. आग इतकी भीषण होती की शेजारील घरे पेट घेतात की काय? असे वाटत होते. गावातील नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केले पण आग नियंत्रणात आली नाही. अग्निशामक यंत्र व नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेजारची घरे वाचली. शुभम अवचार यांचे मूळगाव कळंबेश्वर असून, ते व्यवसायाच्या निमित्ताने हिवरा आश्रम येथे आले आहेत. ते व त्यांचा भाऊ आकाश अवचार हे होतकरू तरूण पै पैजमा करून त्यांनी महागड्या मशनरीज दुकानात आणल्या. दुचाकी व चारचाकीचे पंक्चरची कामे व इतर वाहनोवयोगी सेवा येथे दिली जाते. परंतु, कष्टातून उभा केलेला व्यवसाय काही क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. त्यामुळे अवचार बंधुंवर मोठे संकट कोसळलेले आहे.
दरम्यान, महसूलच्या विभागाच्यावतीने मंडळ अधिकारी राजेंद्र आव्हाळे, तलाठी पी. आर. रहाटे व राहुल मोहिते यांनी पंचनामा केला आहे. यात एअर कॉम्प्रेसर, ग्रॅडर, पंचर मशिन, नट खोल मशिन, वॉशिंग मशिन, मोटार, ट्रॅक्टरचे टायर, ऑईल पेटी, मोटर सायकल इंजीन, बाईक बॅटरी, मोटर सायकलचे इंजिन, इतर स्पेअर पार्ट व सर्व्हिसिंग उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. झालेले नुकसान भरून निघणारे नसले तरी शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी शुभम अवचार यांनी केली आहे. तसेच, परिसरातील नागरिकांनीदेखील आपआपल्या परिने मदतीचा हात पुढे केलेला आहे.
——————