राष्ट्रवादीत भाकरी फिरली!; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष
UPDATE
पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रमात कार्यध्यक्ष पदाची घोषणा झाल्यानंतर अजित पवार हे पुण्याकडे निघाले. अजित पवार विमानातून थेट पुण्यात पोहोचले. पुण्यात पोहोचल्यानंतर अजित पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘कार्यक्रमात घोषणा झाल्यानंतर लगेच निघालो. मी समाधानी आहे. मी विमानतळावर पोहोचलो. नंतर काही जणांचे फोन आले. माझ्या नाराजीच्या बातम्या चालवण्यात आल्या. असल्या बातम्या देणं बंद करा. माझा उद्या एक नियोजित राजकीय कार्यक्रम असल्याने दिल्लीतून पुण्यात आलो’.
– सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय राजकारणात वर्णी
– अजित पवारांना ‘साईड लाईन’ केल्याची दबक्या आवाजात चर्चा!
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – आज दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली असून, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याशिवाय, या नेत्यांसह पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. मात्र, यामध्ये अजित पवारांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यकारी अध्यक्ष पदासह सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली असून, प्रफुल पटेल यांच्याकडे गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे नेते सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनादेखील राष्ट्रीय राजकारणातील जबाबदारी मिळाली असून, त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद मिळाले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत अजित पवार ‘साईड ट्रॅक’वर गेले काय? अशी चर्चा रंगली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन नवी दिल्लीत साजरा केला गेला. या कार्यक्रमात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. पक्षात कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून, या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वत: पवार यांनी दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पवार म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाच्यावतीने लाच देऊन मध्यप्रदेशमधील कमलनाथ यांच्या सरकारकडून सत्ता ताब्यात घेतली, असा आरोप पवारांनी केला. त्यामुळे विरोधी पक्षातील लोक एकत्र येऊन भाजपचा सामना केल्यास देशात बदल होईल, असा मला विश्वास आहे, असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित पवारदेखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चेंबूर येथील सभेत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे सूचक वक्तव्य केले होते. जर भाकरी वेळीच फिरवली नाही तर करपू शकते, असे म्हणत एक इशारा दिला होता. त्यानंतर ‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. तरुण कार्यकर्त्यांचे सलग आंदोलन, देशभरातील विरोधी पक्षाच्या बड्या नेत्यांची विनंती यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आज भाकरी फिरवत पक्षाची सूत्रे खा. सुप्रिया सुळे व खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपावली आहेत.
#WATCH | NCP chief Sharad Pawar appoints Praful Patel and Supriya Sule as working presidents of the party pic.twitter.com/v8IrbT9H1l
— ANI (@ANI) June 10, 2023