Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsWorld update

“तुमचा दाभोळकर करू”, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी!

– पवार साहेबांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास देशाचे व राज्याचे गृहमंत्री जबाबदार – खा. सुप्रिया सुळे
– राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल


UPDATE :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153 A, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहेत. खासदार संजय राऊत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्हीही गोवंडीतील राहणारे आहेत. नशेच्या धुंदीत त्यांनी ही धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती आहे.


मुंबई (प्राची कुलकर्णी) – महाराष्ट्रासारखे आधुनिक व पुरोगामी राज्य घडविण्यात ज्यांनी आपले आयुष्य वेचले, असे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्राचे भाग्यविधाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना दोन भामट्यांनी ट्वीटर व फेसबुकद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेने उभा महाराष्ट्र संतप्त झाला असून, सर्वपक्षीय नेत्यांनीदेखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, त्या तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना भेटल्या, व या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. सुळे यांनी पवार साहेबांच्या जीविताला काही झाल्यास त्याला राज्याचे व केंद्राचे गृहमंत्री जबाबदार राहतील, असे ठणकावले. तसेच अमित शाह यांनी याप्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही केली.

ट्वीटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापैकी फेसबुकवरील पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आलेली आहे. तर सौरभ पिंपळकर या ट्वीटर हँडलवरुन शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा असलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या मजुकराची गंभीर दखल घेण्यात आली व खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांनी याप्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन सुप्रिया सुळे यांना दिले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील या घटनेबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘चूक करणार्‍याला अटक करत कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. सौरभ पिंपळकर या नावाने असलेल्या ट्वीटर अकाऊंटवर ही व्यक्ती अमरावतीची असल्याचे नमूद आहे. तसेच तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचेंही त्याच्या अकाऊंटवर नोंदवलेले आहे. मात्र, हे अकाऊंट ओरिजिनल आहे की फेक आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शरद पवार यांना आलेल्या धमकीप्रकरणी सुप्रिया सुळेंकडून मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा धमक्या आल्या असतील तर गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यावी. शरद पवारांना धमकी येणे दुर्दैवी आहे. राजकारणात मतभेद जरुर असतात. मात्र, इतक्या खालच्या स्तरावर जाऊ नये, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

धमकीनंतर शरद पवार यांची पहिल्यांदाचा प्रतिक्रिया आली आहे. ‘ मी धमकीची चिंता करत नाही, धमक्यांना घाबरत नाही. ज्यांच्याकडे जबाबदारीची ही सूत्रं आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही,’ असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे. काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनीदेखील या घटनेचा निषेध केला असून, दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

पवार यांची सुरक्षा वाढवावी- प्रकाश आंबडेकर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली. या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. शरद पवार, संजय राऊत यांना धमकी येणे ही गंभीर बाब असून शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. दोन्ही नेत्यांना पोलिसांनी पूर्णपणे संरक्षण दिले पाहिजे, शासन ही दक्षता घेईल अशी आम्ही आशा बाळगतो, असे प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे.


ज्येष्ठ नेते शरद पवार यांना धमकी दिल्याच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलिस निश्चितपणे कारवाई करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ पिंपळकर हा अमरावतीमधील गोपालनगर भागात राहणारा आहे. सौरभ हा अमरावती भाजप युवा मोर्चाचा तो पदाधिकारी आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिल्या आहेत. या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे. सौरभ पिंपळकर याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतचे फोटो आता व्हायरल होत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!