BULDHANAVidharbha

राजपदाला प्रतिष्ठा देण्यासाठी महाराजांनी शिवराज्याभिषेक घडून आणला – शिवश्री संजय खांडवे

– अवघड प्रश्नांची उत्तरे शिवचरित्रात सापडतात – सुरेश देवकर

बुलढाणा (संजय निकाळजे) – सोन्याच्या सिंहासनावर बसायला महाराजांना फुरसत तरी कोठे होती. मात्र राजपदाला प्रतिष्ठा देण्यासाठी महाराजांनी शिवराज्याभिषेक घडून आणला. मराठी मातीसाठी हा क्षण अभिमानाने उर भरून यावा असाच आहे. शिवाय, मध्ययुगातील हा पहिला स्वतंत्र दिवसही आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढें अभ्यासक शिवश्री संजय खांडवे यांनी केले.

शिवजयंती उत्सव समिती कार्यालयात ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवश्री संजय खांडवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर होते. या प्रसंगी खांडवे यांनी शिवचरित्रातील अनेक उपेक्षित पैलू मांडले. ते म्हणाले, की सोन्याच्या सिंहासनावर बसणे ही काही हौशीची गोष्ट नव्हती. महाराज तर कायम मातीशी जोडलेले व्यक्तिमत्व होते. मात्र राज्याभिषेक करून त्यांनी कालगणना सुरू केली. स्वतःचे होन (नाणे) तयार केले. मराठी भाषा शब्दकोश तयार केला. ह्या सुधारणा राज्याभिषेकानंतर शक्य झाल्या. एकूणच मराठी मातीचा माथा उन्नत करण्यासाठी सर्व ते प्रयत्न त्यांनी केले. इतिहासात ५०० वर्षानंतर झालेला हा सोहळा पहिला स्वातंत्र्य दिन आहे, असे खांडवे म्हणाले. यावेळी त्यांनी जिजाऊंचे कर्तृत्व, शहाजी राजांची राजकीय कारकीर्द, शिवरायांनी केलेल्या विविध सुधारणा आदी बाबींवर भाष्य केले.
प्रास्ताविक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांनी केल. जगातील महान राजांचे यादीत शिवरायांचा गौरव होतो ही बाबा आपला ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे असल्याचे डॉक्टर चिंचोले म्हणाले. कार्यक्रमास समिती सचिव सुनील सपकाळ, डॉक्टर राजेश्वर उबरहांडे, प्रा.अनिल रिंढे ,राजेश हेलगे ,डी एस लहाने, शाहीनाताई पठाण, पत्रकार गणेश निकम, पत्रकार गणेश उबरहांडे, शेजोळसाहेब, विजयाताई काकडे, अनुजा सावळे, डॉ लता बाहेकर, स्वाती कनेर, प्रमोद टाले, उत्तमराव बिडवे, वंदनाताई निकम आदी उपस्थित होते.

अवघड प्रश्नांची उत्तरे शिवचरित्रात सापडतात – सुरेश देवकर
नव्याने श्रीमंत झालेला वर्ग अनावश्यक संपत्तीचे प्रदर्शन मांडत असून समाजाच्या रचनात्मक कार्यावर खर्च करण्याऐवजी वायफळ खर्च करतो. याचा परिणाम सामान्य माणसावर होत असतो. लोक श्रीमंतांच् अनुकरण करतात. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. शिवचरित्रात सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. जो वाचेल तो प्रश्न सोडवेल. मी शिवस्वरूप ,शिवसूत्र समजून घेत वाटचाल केली असल्याचे सांगून सुरेश देवकर यांनी अध्यक्षीय भाषणातून शिवचरित्राचे अनेक पैलू उडवून दाखवले.

उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा विविध उपक्रमाने साजरी करणारे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले यांचा सन्मान करण्यात आला. कृषी परंपरेला धरून पूर्वजांचे स्मरण करीत सत्यशोधक पद्धतीने, साध्या पद्धतीने, अनावश्यक खर्चाला फाटा देते मुलीचा विवाह लावणारे सुरेश देवकर यांचा समितीने यावेळी शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच प्राचार्य प्रशांत कोठे व पत्रकार राजेंद्र काळे, बुलडाण्यातील अश्वप्रेमी तरुण यांचाही सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!