मुंबई (प्राची कुलकर्णी) – बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचे आज बरोबर मृग नक्षत्रावर केरळात आगमन झाले असून, पुढील सात दिवसांत तो तळकोकणात व नंतर महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. यंदा तब्बल सात दिवस मान्सून उशिरा आला. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश भागात आज बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. मान्सूनच्या पावसाच्या एक दोन जोरदार सरी कोसळल्या तर पेरण्यांना सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसलेले आहेत. पुढील दाेन-चार दिवसांत विदर्भात पावसाचे संकेत देण्यात आले आहेत.
मान्सून केरळात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने केली आहे. साधारणत: १ जूनला दाखल होणारा मान्सून यावर्षी एक आठवडा उशिराने दाखल झाला. मान्सून ४ जूनरोजी केरळमध्ये पोहोचेल, असे हवामान खात्याने यापूर्वी सांगितले होते. दरम्यान, आधी भारतीय हवामान खात्याने ९ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, केरळमध्ये दाखल व्हायलाच ८ जूनचा दिवस उजाडल्याने आता महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश पुढे ढकलला आहे. असे असले तरी पुढील ३-४ दिवसात मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो. सद्या केरळात जोरदार मान्सूनचा पाऊस पडत असून, केरळातील ९५ टक्के भाग व्यापला आहे. तसेच काही तासांत तो कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये पोहोचेल. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले की, वार्याचा वेग आणि परिस्थिती योग्य असल्यास ते दक्षिणेकडून उत्तरेकडे खूप वेगाने पुढे जाईल. पुढील आठवड्यापर्यंत उत्तर भारतात पोहोचेल. केरळमध्ये साधारणपणे १ जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. अरबी समुद्रातील बिपरजॉय वादळाने मान्सूनचा मार्ग अडवला होता. त्यानंतर जूनच्या दुसर्या आठवड्याच्या अखेरीस मान्सून दाखल होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले होते. पण बिपरजॉय आता पाकिस्तानच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे मान्सूनचा केरळमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केरळनंतर आता मान्सून तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर भागात जाईल. पुढील ४८ तासात केरळच्या सर्व भागांमध्ये मान्सूनची हजेरी लागणार आहे. चक्रीवादळ गेले की, मान्सून पूर्ण तीव्रतेने देशाच्या इतर भागात वाटचाल करेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या १२ वर्षांचा अभ्यास केला असता केवळ एका वर्षीचे मान्सून महाराष्ट्रात ७ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता. मान्सूनचा गेल्या १२ वर्षातील प्रवास पाहिला असता, महाराष्ट्रात मृग नक्षत्राला मान्सून दाखल होतो, हे समीकरण बदलले असल्याचं दिसून येत आहे.
————–
Most awaited Monsoon made onset in Kerala finally. To cover more parts of Karnataka & Tamilnadu in next 24 -36 hours ⛈️😍 #Monsoon2023 pic.twitter.com/sBUdOGT1lv
— Vizag weatherman🇮🇳 (@KiranWeatherman) June 8, 2023