BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

बाऊन्स होणारे चेक दिले; सोयाबीन, तुरीची खरेदी करून व्यापारी पळाला!

मेहकर/ बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बाऊन्स होणारे चेक देऊन शेतकर्‍याची जवळजवळ एक कोटी रूपयांची सोयाबीन व तूर खरेदी केली व पैसे न देताच पोबारा केला. ही घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे २७ डिसेंबर २०२२ रोजी घड़ली. याप्रकरणी देऊळगाव साकरशा येथील कैलास राधाकृष्ण ढवळे याच्यासह एकाच कुटुंबातील चार जणांविरूध्द जानेफळ पोलिसांत ५ जूनरोजी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील आशीष कैलास ढवळे यास अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील कैलास राधाकृष्ण ढवळे, आशीष कैलास ढवळे, सौ.किरण कैलास ढवळे व चिवू आशीष ढवळे यांनी देऊळगाव साकरशा येथील कृष्णा भीमा चव्हाण व इतर शेतकर्‍यांची विविध बँकांचे बाउन्स होणारे चेक देऊन प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांप्रमाणे १२३७ क्विंटल २१ किलो सोयाबीन किंमत ८६ लाख ६० हजार ४७० रुपये व ९ हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे १३८ क्विंटल ७ किलो तूर किंमत १२ लाख ४८ हजार ३०० रुपये असा एकूण ९९ लाख ८ हजार ७७० रुपयांचा शेतमाल खरेदी केला. संबंधित शेतकर्‍यांना आठ ते दहा दिवसांत तसेच एक ते दोन महिन्यांत पैसे देतो, असे आमिष दाखविले. परंतु पैसे न देताच पोबारा केला. तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार देऊळगाव साकरशा येथील कृष्णा भीमा चव्हाण यांनी दिली होती. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने आरोपी कैलास राधाकृष्ण ढवळे, आशीष कैलास ढवळे, सौ. किरण कैलास ढवळे व चिवू आशीष ढवळे रा. देऊळगाव साकरशा यांच्याविरूद्ध जानेफळ पोलिसांत अप नं.०१६४/२३ कलम ४०६, ४१९, ४२०, २९४, ५०६, ३४ भादविंनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी आशीष कैलास ढवळे यास अटक करण्यात आल्याचे जानेफळचे ठाणेदार तथा तपास अधिकारी प्रविण मानकर यांनी सांगितले.


विशेष म्हणजे, संबंधित शेतकर्‍यांनी यासंदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची ५ जूनरोजी भेट घेतली होती. त्यांनी तात्काळ याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. तसेच संबंधित ठाणेदार यांना कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ड़ॉ. ज्ञानेश्वर टाले यांनीही संबंधित शेतकर्‍यांना घेऊन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!