– बाबासाहेबांची मिरवणूक काढली म्हणून नांदेड जिल्ह्यात झाली युवकाची हत्या
बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गावातून मिरवणूक काढली म्हणून जातीयद्वेषातून बोंढार, जिल्हा नांदेड येथील युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ चिखली तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नांदेड जिल्ह्यातील मौजे बोंढार येथील अक्षय भालेराव या २३ वर्षीय युवकाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गावामधून मिरवणूक काढल्यामुळे मनुवादी विकृतीच्या सामूहिक गटाने पूर्वग्रह दूषित कट रचून त्याची सामूहिक हत्या घडवून आणली. सदर प्रकरणांमध्ये मयताच्या भावाने फिर्याद दिली असून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. व त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण हे तपास करीत आहेत. या गुन्ह्यामधील आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी चिखली तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय धुरंदर, संजय जाधव, एड विजय वानखेडे, प्रा मघाडे, तालुका सचिव जितेंद्र निकाळजे, भाई सिद्धार्थ पैठणे, चिखली शहराध्यक्ष बाळासाहेब भिसे, शेख फईम, दीपक साळवे, संघर्ष, गजानन डोंगरदिवे ,शेख हुसेन, संदीप लव्हाळे यांच्या सह्या आहेत.