वर्धा (प्रकाश कथले) – पोलीस पाटील पदभरतीच्या लेखी परीक्षेतील गडबड घोटाळ्यामुळे आज परीक्षार्थींची चांगलीच भंबेरी उडाली. प्रवेश पत्रावर परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी दोन तास अन् प्रश्नपत्रिकेत केवळ एक तासाचाचं उल्लेख असल्याने परीक्षार्थींना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सदर गडबड घोटाळा परीक्षार्थीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
जिल्ह्यातील पोलीस पाटील पदासाठी आज, सोमवारी लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आज वर्ध्यातील न्यु इंग्लिश हायस्कूल मध्ये परीक्षा घेण्यात आली. याकरिता परीक्षार्थींना प्रवेशपत्र देखील देण्यात आले. त्यानुसार परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी दोन तास असा दर्शविला. ही परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होणार आणि चार वाजता संपणार असा स्पष्ट उल्लेख प्रवेश पत्रावर आहे. परंतु परीक्षार्थींच्या हातात जी प्रश्न पत्रिका पडली, त्यात परीक्षेसाठीचा वेळ हा केवळ एक तास असा दर्शविण्यात आला. त्यामुळे बर्याच परीक्षार्थींची वेळेवर भंबेरी उडाली. प्रत्यक्षात परीक्षा ही केवळ एक तासाचीचं घेण्यात आली, त्यामुळे परीक्षार्थींना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पोलीस पाटील पदभरती परीक्षेतील हा गडबड घोटाळा सध्या परीक्षार्थीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.