मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ‘तारीख पे तारीख’!
– लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, पण निर्णय मुख्यमंत्री घेतील – देवेंद्र फडणवीस
– मुंबईसह आगामी निवडणुकांबाबत चर्चा, मंत्रिमंडळ विस्तारातील काही नावांना शाहांचा हिरवा कंदील!
मुंबई (खास प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांची रणनीती आणि शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केलेली १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका यासह राज्यातील विविध ज्वलंत मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ‘हायकमांड’ तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. काल रात्री दोन वाजता या नेत्यांची शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर सोमवारी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे हेच निर्णय घेतील, असे जाहीर केले. दरम्यान, सूत्राच्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस यांनी काही नावांची यादी शाह यांच्यापुढे सादर केली असता, यातील काही नावे बदलण्याचा सल्ला त्यांना मिळाला असल्याचे कळते. त्यामुळे विद्यमान सरकारमधील काही वादग्रस्त व निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू व काही नव्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. तथापि, हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत मात्र शिंदे गट व भाजपात मतौक्य नसल्याने या विस्ताराबाबत अद्याप तरी ‘तारीख पे तारीख’च सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल तडकाफडकी गेले होते. रात्री दोन वाजता शाह यांनी या दोन्ही नेत्यांना भेट दिली. राज्य मंत्रिमंडळात सद्या १८ मंत्री असून, जास्तीत जास्त ४३ जणांचे मंत्रिमंडळ असू शकते. त्यामुळे काही जागा रिक्त ठेवून उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शाह यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यावेळी त्यांच्यापुढे ठेवण्यात आलेल्या यादीतील काही नावांत त्यांनी बदल सूचविला असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातून अनेकजण इच्छुक असून, बुलढाण्यातून एका नेत्याला संधी मिळणार असल्याने तेथे भाजपला मंत्रिपद हवे आहे. तर शिंदे गटातूनही डॉ. संजय रायमुलकर, आणि संजय गायकवाड हे इच्छुक आहेत. विदर्भातील एकमेव महिला आमदार असलेल्या श्वेताताई महाले पाटील यांना महिला व बालकल्याण विभागाचे मंत्रिपद देण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेतृत्व इच्छुक असल्याचेही सूत्राने सांगितले आहे.
आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली असली तरी, राज्यातील राजकीय परिस्थिती, मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी, शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांकडे आलेली १६ आमदारांच्या अपात्रतेची याचिका, आणि मंत्रिमंडळ विस्तार यासंदर्भात अमित शाह यांच्याशी शिंदे व फडणवीस यांची सविस्तर चर्चा झाली असल्याची खात्रीशीर माहिती सूत्राने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह, राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्याबाबतही यावेळी रणनीती निश्चित झाली असल्याचे समजते.
———————