बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडा; तगडा उमेदवार देऊन, अन् जिंकूही!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेसचा पारंपरिक असलेला, आणि काँग्रेसची जोरदार राजकीय ताकद असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसलाच सोड़लाच कसा? नव्हे सोड़ूनही काय उपयोग झाला? असा रास्त सवाल करत, आता हा लोकसभा मतदारसंघ पूर्ववत काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी करत येथे तगड़ा उमेदवार देवू व जिंकूही असा विश्वास जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी मुंबई येथील आढावा बैठकीत वरिष्ठांसमोर व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी रेटण्यात आली आहे. या मतदारसंघातून माजी आ. हर्षवर्धनदादा सपकाळ यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीही काही कार्यकर्त्यांनी यावेळी केली. सपकाळ लोकसभेला उभे राहिले तर काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असेही पदाधिकारी व कार्यकर्ते वरिष्ठांना समजावून सांगताना दिसून आले.
काल २ जूनरोजी टिळक भवन, मुंबई येथे राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठका घेण्यात आला. यावेळी जिल्हानिहाय प्रमुख पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यात आले. बुलढाणा ही काँग्रेसची लोकसभेची पारंपरिक जागा आहे. येथून ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक निवड़ून आले. पण अचानक राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्याचे कारण काय? यावरही बैठकीत खल झाला. झाले गेले गंगेला मिळाले, पण आता ही जागा पूर्ववत काँग्रेसला सोड़वून घेण्याची मागणी यावेळी जोराने करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सविस्तर अहवाल या बैठकीत सादर केला. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंड़ा राहिला आहे, तर नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवड़णुकांतही काँग्रेसच्या जागा जास्त निवड़ून आल्या आहेत. यावेळी जिल्हा प्रभारी नाना गावंड़े यांनीही सड़ेतोड़पणे मत मांड़त काँग्रेसला मतदारसंघ सुटावा, अशी मागणी केली. काँग्रेसला मतदारसंघ सुटल्यावर तगड़ा उमेदवार देवू व जिंकू, असाही विश्वास यावेळी देण्यात आला..
यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ, आ. धीरज लिंगाड़े, प्रदेश सचिव सौ.जयश्रीताई शेळके, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी सभापती दिलीप जाधव आदी इच्छुकांची नावेदेखील यानिमित्ताने समोर आली. तथापि, हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नावावर सर्वांचा जोरही दिसून आला. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या नेत्यांकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसभा लढविली तर आपला विजय निश्चित आहे, अशी भूमिका काही पदाधिकारी यांनी मांडल्याचे कळते. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी यावेळी विचार व्यक्त केले. याबाबतीत जिल्ह्याचे काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. मुकूल वासनिक यांचेदेखील मत विचारात घेणे गरजेचे आहे, असेही काहींनी सांगितले. यावेळी प्रदेश पक्ष निरीक्षक दिलीप भोजराज, ड़ॉ. अरविंद कोलते, प्रदेश सचिव दादूशेठ, रामविजय बुरूंगले, धनंजय देशमुख, सौ. स्वाती वाकेकर, मेहकर पक्षनेते अॅड़. अनंतराव वानखेड़े, जेष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, अॅड़ हरिष रावळ, सतिश मेहेंद्रे, मनोज कायंदे, सुनिल सपकाळ, गणेशसिंह राजपूत, प्रमोद अवसरमोल, गौतम गवई, शैलेश खेड़कर, प्रा. खर्चे, मोईन काझी, एकनाथ चव्हाण आदींसह इतर नेते उपस्थित होते.