BULDHANAChikhaliHead linesVidharbha

खरीप हंगाम तोंडावर; ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने शेतकर्‍यांच्या खात्याला लावला ‘होल्ड’!

गुगल पे, फोन पे बंद! शेतकर्‍यांची केली आर्थिक कोंडी!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा अधिकारी यांनी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जे थकीत कृषी कर्जदार आहे त्यांच्या खात्याला होल्ड लावल्यामुळे शेतकर्‍यांचे फोन पे, गुगल पे, व एटीएम हे पूर्णतः बंद पडलेले आहे. याबाबत राज्य सरकारची शेतकरीहिताची भूमिका असताना येथील शाखा अधिकारी यांनी हा तुघलकी कारभार केल्याने शेतकरीवर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हे होल्ड तातडीने हटवावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. अन्यथा, लवकरच शेतकर्‍यांच्या संयमाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

आज शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी झगडत असतानाच ज्या बँकेच्या भरवशावर ग्रामीण भागातील कारभार चालतो, त्याच बँकेने त्यांचे खाते होल्ड केल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द ही परिसरातील एकमेव अशी राष्ट्रीयकृत बँक आहे की, त्या बँकेमध्ये कृषी कर्जदार मुलांचे शैक्षणिक खाते व इतर सर्व पैशाचा कारभार या खात्यातून चालतो. परंतु काही दिवसापूर्वी आज जो कॅशलेस व्यवहाराची भारतामध्येच नव्हे जगामध्ये अशी प्रणाली गुगल पे, फोन पे हेसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रने कृषी कर्जाच्या खातेदारांचे बंद पाडले आहे. त्यामुळे त्यांचे जीवनमान पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आज शेतकर्‍यांच्या कृषी कर्जदार मुलांची शैक्षणिक फी, असो किंवा आज शेतीसाठी लागणारे बी बियाणे, खते व शेती मशागतीसाठी लागणारा पैसा हासुद्धा शेतकरी वर्गाला राष्ट्रीय बँकेमधून देणे घेणे करावे लागते. परंतु सदर खात्याला होल्ड लागल्यामुळे त्यांचा शेतीचा तसेच शैक्षणिक कामेसुद्धा खोळंबली आहेत. यामुळे त्यांच्या शेतीवर तसेच त्यांच्या पाल्यावरसुद्धा याचा परिणाम दिसून येत आहे. सदर विद्यार्थ्यांचे पैसे हे वडिलांच्या खात्यावर येत असल्यामुळे त्यालासुद्धा होल्ड लागलेला होता. आज मुलांना जे शासन पैसे देते तेसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द यांनी बंद केलेले होते. बँक ऑफ महाराष्ट्र यापूर्वी आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना न देता आमचे खाते होल्ड केले आहे, अशा तक्रारी शेतकरी करत आहेत.

अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक या भागामध्ये सुशिक्षित बेरोजगार मुले नेमकेच दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहे. शेतीला पर्याय व्यवसाय म्हणून या भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले ही दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहेत. त्यांचे खातेसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहेत. त्यांच्यावर सुद्धा जनावरांना लागणारे ढेप व इतर खाद्य घेण्यासाठी खाते होल्ड असल्यामुळे पैसे नाहीत. त्यांचा परिणाम त्यांच्या दुग्ध व्यवसाय वरसुद्धा झाला आहे. आम्ही कर्ज काढले आहे, आम्ही भरण्यास तयार आहे, परंतु आम्हाला थोडी सवलत द्या, अशी एकच भावना कृषी कर्ज थकीत शेतकर्‍यांच्या बोलण्यातून दिसून येत होती. याबाबत शाखाधिकारी यांना होल्ड उठविण्याबाबत अर्ज देण्यात आला असून, तातडीने कारवाई न झाल्यास मात्र शेतकरी उद्रेक अटळ दिसतो आहे.


आम्ही आमची लाखो रुपयाची जमीन बँकेला तारण दिली आहे. त्याबद्दल त्यांनी आम्हाला फक्त दहा ते वीस हजार रुपये एकरी कर्ज दिले आहे. आम्ही ते कर्ज भरण्याससुद्धा तयार आहोत. परंतु आज शेतीमालाला भाव नाही, आता बियाण्याचे तसेच शेती तयार करण्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे आम्ही सध्या कृषी कर्ज भरण्यास असमर्थ आहोत. आम्ही भविष्यात थोडे थोडे करून आमचे कृषी कर्ज भरण्यास तयार आहोत, आमचे जे खात्याला होल्ड आहे ते तुरंत काढून आमचे व्यवहार सुरळीत करून देण्यात यावे.
– मोहन पडघान, शेतकरी, मेरा बुद्रूक

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता, आम्ही कोणत्याही शेतकर्‍यांचे बचत खाते हे होल्ड केले नाहीत. फक्त फोन पे व एटीएम हेच बंद आहे. बचत खात्यात येणारे पैसे बचत खात्यातच आहे, त्यामुळे कोणतेही शेतकर्‍यांनी घाबरून जाण्याची किंवा खाते होल्ड झाल्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये.
– श्री. कांगणे, शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मेरा खुर्द.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!