BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

उन्हाळ्याच्या तप्त झळा सहन करणारी गुरेढोरे, तहानलेले वाटसरू मंजुळकरांच्या जलसेवेने होतात तृप्त!

– दररोज शेकड़ो मुक्या जनावरांची भागवितात तहान, वाटसरूंनाही ‘आरओ’चे ‘गार’ पाणी!

मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – ‘शिवभावे जीव सेवा’ हा स्वामी विवेकानंद यांचा मंत्र ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे पत्रकार तथा कृतीशील शेतकरी अनिल मंजुळकर यांनी अक्षरशः अमलात आणला असून, ते जलसेवेच्या माध्यमातून असंख्य जीवांची सेवा करत आहेत. म्हणतात ना जल ही जीवन है। त्यातच उन्हाळ्यात तर पाण्याचे महत्त्व काहीसे वेगळेच असते. तापत्या उन्हात जीवाची लाहीलाही होत असताना अचानक एखाद्याने ‘गार’ पाणी पाजले तर आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, नव्हे केलीही पाहिजेत. मेहकर तालुक्यातील गोमेधर येथील असेच काहीसे ध्येयवेड़ा शेतकरी तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे धडाडीचे पत्रकार अनिल मंजूळकर हे मेहकर ते खामगाव रोड़वरील संगम (गोमेधर) फाट्यावर स्वखर्चातून बांधलेल्या हौदाच्या माध्यमातून दररोज शेकड़ो मुक्या जनावरांची तहान भागवतात, तर वाटसरूही येथील ‘आरओ’चे ‘गार’ पाणी पिऊन संतुष्ट होतात. विशेष म्हणजे, ही मोफत जलसेवा ते गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता करत आहेत.

शेगाव, खामगाव ते मेहकर या पालखी मार्गावर देऊळगाव साकरशाच्या पुढे १५ किलोमीटर अंतरावर संगम (गोमेधर) फाटा असून, समोरच गौतमेश्वर संस्थानदेखील आहे. सदर संगम फाट्यावरील शेतात गोमेधर येथील शेतकरी तथा पत्रकार अनिल मंजूळकर यांनी स्व-खर्चातून तीन हजार लीटर क्षमतेचा हौद बांधला आहे. या हौदावर दररोज शेकड़ो गुरेढोरे वर्षभर आपली तहान भागवतात. उन्हाळ्यात तर येथे पाणी पिण्यासाठी गुराढोरांची रेलचेल असते. तसेच संगम फाट्यावरील माऊली जलच्या माध्यमातून वाटसरूंना आरओचे गार पाणी देखील मोफत पाजले जाते. एवढेच काय, खामगाव ते मेहकर या वर्दळीच्या असलेल्या रोड़वरील एस.टी.बसेस, खाजगी वाहनातील प्रवाशीही आरओचे गार पाणी पिऊन संतुष्ट होतात. विशेष म्हणजे, अनिल मंजुळर यांचा हा दखल घेण्याजोगा सामाजिक उपक्रम गेल्या आठ ते दहा वर्षापासून अखंड़ सुरू असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!