Breaking newsBULDHANAHead linesVidharbhaWorld update

काळा मंगळवार! भीषण बस अपघातात ९ ठार; १२ प्रवासी गंभीर जखमी

UPDATE : अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येका १० लाखाची मदत जाहीर!

सिंदखेडराजा येथील पळसखेड चक्का गावाजवळ झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्पेâ प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत, तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अपघाताविषयी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने थेट मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे कळविले होते. ही माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली, तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाइकांना मदत करण्याचे निर्देश दिले.


– गंभीर जखमींवर सिंदखेडराजा येथे उपचार सुरू, काहींना जालना व  छत्रपती संभाजीनगरला हलविले!

सिंदखेडराजा/बुलढाणा (बाळू वानखेडे) – पुण्याहून मेहकरकडे येणार्‍या एसटी महामंडळाच्या बसला मेहकरवरून सिंदखेडराजाच्या दिशेने जाणार्‍या भरधाव कंटेनरने समोरासमोर दिलेल्या जोरदार धडकेत बसमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले, तर चार प्रवाशांनी उपचारादरम्यान दम तोडला. दोन्ही वाहने भरधाव वेगात एकमेकांना समोरून धडकल्याने हा भीषण अपघात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा ते मेहकर रोडवरील पळसखेड चक्का गावाजवळ घडला. या दुर्देवी अपघातात आतापर्यंत ९ जण ठार झाले असून, आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच, १२ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे उपचार सुरू होते. काहींना तातडीने जालना व छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून, कंटेनरमध्ये फसलेल्या चालकाला कटरच्या सहाय्याने पत्रा कापून बाहेर काढावे लागले. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर आगाराची एसटी बस (क्रमांक एमएच ४०-५८०२) ही पुणेवरून छत्रपती संभाजीनगरमार्गे मेहकरकडे येत होती. त्याचवेळी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान कंटेनर ट्रक (क्रमांक ओडी ११ एस १६५७) आणि या बसची भरधाव वेगात असतानाच समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर १२ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच मेहकर आगाचे व्यवस्थापक जोगदंडे, स्थानिक ग्रामस्थ हे तातडीने घटनास्थळी धावले, त्यांनी पोलिसांना कळवले, त्यानंतर सिंदखेडराजा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी तातडीने मदत व बचाव कार्य राबवून जखमींना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मेहकर आगाराचे व्यवस्थापक जोगदंडे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल होत समयसूचकता दाखविल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले. अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरमधील चालक हा कॅबिनमध्ये फसला होता. त्याला गॅस कटरच्या सहाय्याने कॅबिनचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले. अपघातामध्ये एसटी चालकदेखील जागीच ठार झालेला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस ही वेगाने मेहकरच्या दिशेने जात होती, तर कंटेनर हा मेहकरवरून सिंदखेडराजाकडे भरधाव वेगात येत होता. यावेळी दोघांची काही समजण्याच्याआत समोरासमोर धडक झाली. या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, उर्वरित चार जण उपचारादरम्यान दगावले, आणखी तिघांची प्रकृती अतिचिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही वाहने चक्काचूर झाली असून, जखमींना व मृतकांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी पुढे आली आहे. सिंदखेडराजा पोलिस अधिक तपास करत आहेत.

https://breakingmaharashtra.in/bus_accident_six_killed/


दरम्यान, अमरावती जिल्ह्यात दर्यापूर – अंजनगाव मार्गावर लेहगावजवळदेखील भीषण बस अपघात झाला असून, या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले आहेत. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. एकाच कुटुंबातील १२ जण लग्नासाठी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते. लग्न आटोपून ते दर्यापूरकडे परत येत असताना पाठीमागून आलेल्या एका मोठ्या वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात लहान मुलांचादेखील समावेश असून, एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!