Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsPuneWorld update

राज्यातील निवडणुका लांबणीवर पडणार!

– जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरून पवारांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र!
– मोदी सरकारच्या खुनशीपणाचा वाचला पाढा!

पुणे (विशेष प्रतिनिधी) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे आगामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केली. राज्यातील निवडणुका कधी होतील, हे सांगता येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट करताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून भाजपवर टीकास्त्र डागले. देशात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असून, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० लोकांची चौकशी झालेली आहे. परंतु निष्पन्न काही झाले नाही. अनिल देशमुख यांच्यावर अतिरंजीत आरोप झाले. मात्र त्यातून काहीही पुढे आलेले नाही. चुकीचे काम करणार्‍यांना संरक्षण आणि चांगले काम करणार्‍यांना त्रास, असे या सरकारच्या काळात सुरू असल्याचेही पवार म्हणालेत.

प्रा. राम ताकवले यांच्या श्रद्धांजली सभेनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीतील जागा वाटप, नोटबंदी, ईडीची कारवाई आणि तपास यंत्रणांचा गैरवापर आदी बाबत शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की परमबीर सिंह यांच्याविरोधामध्ये किती तक्रारी आहेत, याचीही माहिती सरकारने घेतली पाहिजे. मलिकांनी समीर वानखेडे यांच्याबद्दल जे सांगितले होते, ते आता खरे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या चौकश्या झाल्या. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या चौकश्या होत आहेत. यावरुन सरकारची भूमिका लक्षात येते. कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना पवार म्हणाले की, राज्यातील निवडणुका कधी होतील, हे मला सांगता येणार नाही. परंतु आगामी निवडणुका लांबणीवर पडू शकतात. महाविकास आघाडीमध्ये कसलाही वाद नसून तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागावाटपाबाबत निर्णय घेतील. यावेळी पवारांनी दोन हजारांच्या बंद केलेल्या नोटेवरुन केंद्राला धारेवर धरले. चलनातून दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय म्हणजे एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावा, या प्रकारातील आहे, अशी खोचक टीकाही पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली.


महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचे निश्चित झाले आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन-दोन सदस्य जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे, मी आणि मल्लिकार्जुन खरगे चर्चा करणार आहोत, असे पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीत मतभेत नाहीत. आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोण आणि दुसर्‍या क्रमांकाचा कोण, याला महत्त्व नाही तर सगळेच पक्ष महत्त्वाचे आहेत, असे पवारांनी स्पष्ट केले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!