BULDHANAChikhaliHead linesMEHAKARVidharbha

तांदुळवाडी येथील कर्जबाजारी शेतकर्‍याची अंबाशी फाट्यावर आत्महत्या

बुलढाणा (सचिन खंडारे) – सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा जवळील तांदुळवाडी येथील कर्जबाजारी शेतकर्‍याने अंबाशी फाट्यावरील एका शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. सदर घटना आज १५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. मृतक शेतकर्‍याचे नाव ज्ञानेश्वर सीताराम बुंधे (वय ५३) असे आहे.

तांदुळवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर बुंधे हे काल दुपारी साखरखेर्डा येथून येतो म्हणून घरुन निघाले होते. परंतु रात्री ते घरी परत आलेच नाहीत. मुलांनी फोन लावून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता फोनही लागत नव्हता. आज सकाळी काही इसमांना त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांनी तांदूळवाडी येथे संपर्क साधून उपरोक्त घटनेची माहिती दिली. सदर शेतकर्‍याने भारतीय स्टेट बँक आणि फायनान्स कंपनीचे कर्ज घेतलेले आहे. पत्नीच्या नावे सुध्दा कर्ज काढलेले आहे. २०१२ साली काढलेले कर्ज माफीत बसले नाही. सतत व्याज वाढत गेल्याने कर्ज भरणेही कठीण झाले. विकलेल्या मालाचे पैसे आणि शासनाने दिलेली मदत कर्ज खात्यात जमा होत असल्याने व खात्याला होल्ड लावलेला असल्याने त्यांच्या हातात दमडीही पडत नव्हती. घरी ७ ते ८ एकर शेती, दोन मुलांचे शिक्षण हा प्रचंड व्याप सांभाळून घर प्रपंच चालविणे कठीण झाले होते. या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. तरी शेतकर्‍यांची व्यथा सरकारने जाणून घेऊन शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करणे गरजेचे असून, अजूनही अनेक शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचा एक रुपयाही पडलेला नाही. त्याचप्रमाणे भारतीय स्टेट बँकेच्या शाखेने अनेक शेतकर्‍यांच्या खात्याला होल्ड लावल्यामुळे लग्नसराईच्या दिवसांमध्ये शेतकरी आणखीनच आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!