Breaking newsHead linesKOLHAPURMaharashtraPachhim MaharashtraSangaliSOLAPUR

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खा. शरद पवारांची फेरनिवड

– विद्यमान सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिने मुदतवाढ

सातारा (जिल्हा प्रतिनिधी) – कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुहूर्तमेढ लावून बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करणार्‍या व आजरोजी राज्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी खा. पवार यांचा एकमेव अर्ज आला होता. तर संस्थेचे विद्यमान सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांना पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकार्‍याची नेमणूक करण्याचा विचार संस्था करत आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी, ९ मे रोजी दर तीन वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांची निवड केली जाते. त्यानुसार, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि मॅनेजिंग काऊन्सिलचे सदस्य यांची निवड करण्यात आली. सचिवपदावर प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनाच सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. नवीन सचिवाची निवड पुढील कालावधीत केली जाणार असून, कार्याध्यक्ष आणि उपकार्याध्यक्ष पदाची निवड २७ मे रोजी पुण्यात होणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शाखांची वाढती संख्या आणि वाढती जबाबदारी लक्षात घेता, प्रशासन गतिमान केले जाणार असल्याचे सूतोवाच शरद पवार यांनी भाषणातून केले होते. त्यानुसार आगामी काळात सचिवपदासाठी माजी सनदी अधिकारी आणि सातार्‍याचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची निवड केली जाणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीला स्वतः विकास देशमुख हजर होते.

  • नवनियुक्त उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि मॅनेजिंग काऊन्सिलचे सदस्य पुढीलप्रमाणे –
  • उपाध्यक्ष – जयश्री चौगुले वाशी, अरुण कडू पाटील उरण, एडवोकेट राम कांडगे पुणे, महेंद्र लाड पलूस.
  • – आजीव सेवक प्रतिनिधी – प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के, आनंदराव तांबे, प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर, विनोद कुमार संकपाळ, सुभाष लकडे, प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे.
  • – मॅनेजिंग कौन्सिल सदस्य – अ‍ॅड. भगीरथ शिंदे, माजी मंत्री अजितदादा पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, रामशेठ ठाकूर, अ‍ॅड.रवींद्र पवार, मीनाताई जगधने, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, अजित भिकू कोंडा पाटील, राहुल जगताप, जनार्दन जाधव, दादाभाऊ कळमकर, प्राध्यापक सदाशिव कदम आणि धनाजी बलभीम पाटील.
    ———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!