– जिल्ह्यात लवकरच सभापती, उपसभापतींच्या निवडी
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या असून, पैकी सात बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाड़ीला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. आता सभापती, उपसभापती निवडीसाठी लवकरच निवड़णूक होणार आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी काल, ९ मेरोजी उपरोक्त सात बाजार समित्यांसाठी बाजार समितीनिहाय पक्षनिरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निवडीत काही गडबड घोटाळा होऊ नये, याची काळजी हे पक्षनिरीक्षक घेणार असून, पक्षाला आपला अहवाल सादर करणार आहेत.
जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी २८ व ३० एप्रिलरोजी निवड़णूक पार पड़ली. यामध्ये खामगाव, शेगाव, चिखली, बुलढाणा, नांदुरा, देऊळगावराजा व जळगाव जामोद बाजार समिती मध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. सदर बाजार समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी लवकरच निवड़णूक होणार आहे. या निवड़णुकीसंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी बाजार समितीनिहाय निरीक्षक ९ मे रोजी नियुक्त केले आहेत. यामध्ये चिखली – अॅड़. साहेबराव मोरे, बुलढाणा – देवानंद कायंदे, नांदुरा – रामविजय बुरूंगले, जळगाव जामोद – दयारामभाऊ वानखेड़े, शेगाव – अशोकराव पड़घान, खामगाव – अॅड़. अनंतराव वानखेड़े व देऊळगाव राजा – लक्ष्मणराव घुमरे यांचा समावेश आहे. संबंधित बाजार समितीत सभापती, उपसभापती निवड़ीसंदर्भात स्थानिक महाविकास आघाडी पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करावे व तसा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटीकड़े पाठवावा, असेही सदर पक्षनिरीक्षक नियुक्ती संदर्भातील पत्रात नमूद आहे.
चिखली बाजार समिती पदाधिकारी निवडीत राजकीय गडबड होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, या बाजार समितीत महाविकास आघाडी मजबूत असल्याने तसा प्रयत्न केला जाणार नाही, अशी माहिती राजकीय सूत्राने दिली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाऐवजी शांत राहणेच विरोधकांनी पसंत केल्याचे राजकीय सूत्राने सांगितले आहे.
——————-