पेठनजीक लक्झरी बस पुलावरून पैनगंगा नदीत कोसळली; दोन महिला ठार, १७ प्रवासी गंभीर जखमी
बुलढाणा/चिखली (जिल्हा प्रतिनिधी) – शेगाववरून पुण्याकडे निघालेली स्वरा ट्रॅव्हल्सची लक्झरी बस चिखली तालुक्यातील उत्रादा पेठनजीक पुलावरून तब्बल १५ फूट खोल पैनगंगा नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात दोन महिला प्रवासी ठार झाल्या असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 17 प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींवर चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काल (दि.९)च्या रात्री साडेअकरा वाजेदरम्यान ही भीषण दुर्घटना घडली. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. त्यानंतर बुलढाणा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव-चिखली दरम्यानची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
या बसमधून अंदाजे तीस प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही भरधाव बस पुलावरून तब्बल १५ फूट खोल नदीत कोसळली. स्वरा ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस शेगाववरून खामगावमार्गे पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस चिखली रोडवरील पेठजवळ आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास १५ फूट खोल नदीत ही बस कोसळली. या अपघातामध्ये महिला प्रवासी संगिता निवृत्ती ठाकरे व अन्य एक महिला ठार, तर संगिता यांचे पती निवृत्ती ज्ञानेश्वर ठाकरे, मुलगा हरिष निवृत्ती ठाकरे, मुलगी समीक्षा निवृत्ती ठाकरे हे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहेत. या शिवाय, १७ प्रवासीदेखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघातस्थळी तातड़ीने गावकरी व पोलीस मदतीला धावून आले व जखमींना चिखली येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातामुळे सदर राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव-चिखली दरम्यानची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. बुलढाणा पोलिस अधिक तपास करत आहेत.
—————–