बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – समाजसेवक पद्मविभुषण अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालत आदर्श कार्य करणार्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचा भव्य राज्यस्तरीय मेळावा शिर्डी येथे सोमवार ८ मे रोजी पार पडला, यात बुलढाणा जिल्हा समन्वयकपदी सौ.ज्योतीताई साहेबराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील तालुका समन्वयक व इतर कार्यकारणी निवडण्याचे अधिकार त्यांना प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांनी नियुक्तीपत्राद्वारे दिले आहे.
सरपंच हा लोकशाहीतील सर्वात महत्वाचा एक घटक असतो. ग्रामसभा ते लोकसभा हा संविधानातील सत्तेचा प्रकार आहे. लोकशाही खर्या अर्थाने तळागाळातून मजबूत करायची असेलतर, सरपंच पदाला पॉवरफुल करणे महत्वाचे आहे. या करीता सरपंच परिषद महाराष्ट्रची स्थापना दत्ता काकडे यांचे संकल्पनेतून करण्यात आली आहे. या संघटनेचे काम संपुर्ण राज्यभर विस्तारले असून, शिर्डी येथील झालेल्या मेळाव्यात ही संघटना विस्तारासाठी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
सौ.ज्योती साहेबराव पाटील यांचे बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. जिजाऊ जन्मोत्सव, शिवजयंती तथा अन्य जयंती-पुण्यतिथी सोहळ्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. मराठा सोयरीक मंडळातही सामाजिक पातळीवर त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे ठरले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेवूनच बुलढाणा जिल्हा समन्वयक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरपंचांची निघणार पायी दिंडी..
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने सरपंचांच्या विविध मागण्यांसाठी येत्या २२ मे पासून कराड ते मंत्रालय मुंबई अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे, या दिंडीत सर्व सरपंचांनी सहभागी होण्याचे आवाहन नियुक्तीनंतर सौ.ज्योती पाटील यांनी केले आहे.