हिवरा आश्रम येथील आशापुरा वर्कशॉपला भीषण आग; ७० लाखांचे नुकसान!
हिवरा आश्रम, ता. मेहकर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – आपल्या कल्पक संशोधकबुद्धीने विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा शोध लावणार्या हिवरा आश्रम येथील विनोद शंकरलाल पटेल (वय 41) या आधुनिक ‘रांचो’चे वर्कशॉप काल रात्री लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाले आहे. विजेच्या शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचे सांगण्यात येते. आशापुरा वर्कशॉप या नावाचे वर्कशॉप पूर्णपणे जळाले असून, त्यात विनोद पटेल यांचे जवळपास ७० लाखांचे नुकसान झाले आहे. चारचाकी वाहने, स्पेअरपार्ट, संशोधनाचे साहित्य आणि संशोधित केलेली उपकरणेदेखील जळून खाक झाली आहेत.
दिनांक ५ जुलैच्या रात्री आशापुरा वर्कशॉपला अचानक आग लागली. तसेच, मोठा आवाजही झाला. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे दिसून आल्यानंतर तातडीने वायरमनला बोलावण्यात आले. तसेच, गावातील तरुण व जाणकारांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेजारीच आशापुरा सॉमिल असल्याने आग भडकू नये, म्हणून तातडीने काळजी घेण्यात आली. परंतु, आगीचे लोळ मोठे असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण झाले. त्यामुळे विनोद पटेल या तरुण संशोधकांच्या वर्कशॉपमधील प्रत्येक वस्तू जळून खाक झाली. या शिवाय, ओमिनी व ऑल्टो या दोन कार व संशोधित उपकरणेही जळाली आहेत. स्पेअरपार्ट, यंत्रांचे विविध सुटे भाग हेदेखील जळाल्याने जवळपास ७० लाखांचे नुकसान झालेले आहे.
विनोद पटेल हे दिव्यांग असून, त्यांना संशोधनाची उपजत बुद्धी आहे. त्यांनी टाकावू वस्तूपासून विविध यंत्रे, उपकरणे तयार केली आहेत. वीजनिर्मिती करणारे जनित्रदेखील त्यांनी टाकावू वस्तूपासून तयार केले असून, त्यांच्या संशोधनामुळे ग्रामीण भागात अगदी स्वस्तात विविध इलेक्ट्रिक उपकरणे उपलब्ध होत असतात, त्यामुळे पटेल यांना हिवरा आश्रमचे रांचोदेखील अभिमानाने म्हटले जाते. परंतु, आज त्यांच्या आयुष्यभराची पूंजी जळून खाक झाली असून, त्यांचे वर्कशॉप जळाल्याने ते खचून गेले आहेत. महसूल यंत्रणेने व वीज वितरण कंपनीने तातडीने पंचनामे करून विनोद पटेल यांना अर्थसहाय्य देण्याची मागणी पुढे आली आहे. या घटनेने मेहकर तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
“विनोद पटेल हे दिव्यांग असून, वाहने व इलेक्ट्रिक उपकरणांचे वर्कशॉप चालवतात. तसेच, ते उपजत संशोधक असल्याने त्यांनी विविध उपकरणे बनवलेली आहेत. परिसरातील वाहन दुरुस्तीची कामे, तसेच स्पेअरपार्ट विक्रीही त्यांच्या आशापुरा वर्कशॉपमधून होत होती. काल रात्री लागलेल्या आगीमुळे त्यांचे अंदाजे ७० लाखांचे नुकसान झालेले आहे. विमा कंपन्या व राज्य सरकारने त्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.”
– मनोहर गिर्हे, सरपंच, हिवरा आश्रम