मुंबई/बुलढाणा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा आणि राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्हाध्यक्षांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी व धाराशीवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे सोपविले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने करण्यात येत आहेत.
आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,पद्मविभूषण श्रद्धेय श्री.@PawarSpeaks साहेब यांनी अचानकपणे राजकीय निवृत्तीची घोषणा केली.त्यांच्या या घोषणेला व्यथीत होऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मा.@Jayant_R_Patil साहेब यांच्या कडे सादर करीत आहे.[1/2]#SharadPawar @supriya_sule pic.twitter.com/bnzlDsQtvS
— Adv.Nazer Kazi (@advkazispeaks) May 2, 2023
बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.नाझेर काझी यांनी राजीनामा देत जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार असल्याचे सांगितले. शरदचंद्र पवार यांच्या निर्णय देशपातळीवर नाही तर जगपातळीवर धक्का देणारा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी व नागरिकांसाठी हा धक्का देणारी तसेच क्लेशदायक घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी फेरविचार करून निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे. प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला आहे. माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा तसेच सर्व पदाचे राजीनामे सादर करणार असल्याचेही अॅड. नाझेर काझी यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणनेनंतर एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू होता, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पायर्यांवर आंदोलन सुरू होतो, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, रोहित पवार हे ‘सिल्व्हर ओक’वर दाखल झाले व त्यांनी शरद पवारांची भेट घेत मनधरणी केली. परंतु, त्यात त्यांना अपयश आले. या शिवाय, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले होते. त्यांनीही पवारांशी चर्चा केली, पण या भेटीचा तपशील हाती आला नाही.
”शरद पवारांनी कोणत्या कारणाने पदाचा राजीनामा दिला हे सांगणे शक्य नाही. अजित पवारांबाबत माध्यमांत जे काही येत होते ते की, त्यांच्या परिवारात काय असेल किंवा शरद पवारांची प्रकृतीचा विषय असो, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतरच सांगणे योग्य ठरेल, असे मत काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. माध्यमांनी आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.