BULDHANAChikhaliVidharbha

आ. श्वेताताई महालेंच्या हातून विकासकार्य घडेल;  आ. बच्चू कडू यांचा विश्वास!

बुलडाणा (खास प्रतिनिधी) – जनतेने निवडून दिल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवताना व परिसराचा विकास करताना जात, धर्म, पक्ष, असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आदर्श लोकप्रतिनिधीची असते. याच भूमिकेतून आ. श्वेताताई महाले यांनी प्रहारच्या रुग्णसेवेकरिता दिलेला शब्द पाळत रुग्णवाहिका दिली. यापुढेही आ. श्वेताताई महाले यांच्या हातून आगामी काळात व्यापक प्रमाणात समाजसेवा आणि विकासकार्य घडेल, असा विश्वास माजी मंत्री आ. बच्चू कडू यांनी येथे व्यक्त केला.

धाड (ता. बुलढाणा) येथे १ मे रोजी महाराष्ट्रदिन व कामगारदिनाचे औचित्त साधून आ. बच्चू कडू यांच्याहस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. श्वेताताई महाले होत्या. तर प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, भाजपाचे ज्येष्ठ नेते हभप प्रकाश महाराज जवंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष देवीदास जाधव, प्रहारचे उपजिल्हाप्रमुख सागर गुजर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रदीप टाकसाळ, तालुकाप्रमुख सुनील वाघ, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख, विधि मोर्चा जिल्हा संदीप उगले, जिल्हा अध्यक्ष विधि आघाडीचे अ‍ॅड. मोहन पवार, राजू नाटेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, संतोष उबाळे, सोनू वाघ, शहराध्यक्ष विशाल विसपुते, प्रवीण वाघ, सुभाष मोहिते, गोपाल तायडे, देवेंद्र पायघन, राजू अपार, अरुण भोंडे, सोनू तायडे, शेख तौफिक, राजू पालकर, अनिल अपार, गणेश जाधव, विष्णू घाडगे, शुभम कुटे, अभिषेक वायकोस, अजय शिंदे, प्रवीण गुजर, पिंटू उबाळे, सचिन नेमाने, दिलीप ठाकरे, सय्यद मोहंमद, विकी सरोदे उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराप्रसंगी धाड येथे रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन आ. श्वेताताई महाले यांनी प्रहार जनशक्ती पक्षाला दिले होते. उपरोक्त आश्वासनाची त्यांनी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर पूर्तता केली. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे रुपांतर जाहीर सभेत झाले. सभेला संबोधित करताना आ. बच्चू कडू यांनी सभागृहात गोरगरीब जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणार्‍या आ. श्वेताताई महाले यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. तसेच भविष्यात चिखली विधानसभा मतदारसंघातील बचत गटाच्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी आ. श्वेताताईंच्या माध्यमातून विविध योजना राबविणार असल्याचे आश्वासन दिले. शेतकरी, दिव्यांगांसाठी केलेल्या आंदोलनांमुळे आमच्यावर साडतीनशे गुन्हे दाखल झाले. यातील बर्‍याच गुन्ह्यात आम्हाला न्यायालयाने शिक्षा सुनावली. कदाचित येणार्‍या काळात तुरुंगातही जावे लागेल. मात्र, याची आम्हाला पर्वा नाही. जिथे कुठे गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगबांधवांवर अन्याय होईल, तिथे बच्चू कडू व प्रहार तुटून पडल्याशिवाय राहणार नाही, असेही आ. कडू ठणकावून म्हणाले.


धाड परिसराच्या सेवेसाठी सदैव तत्पर : आ. महाले
विधानसभेच्या सभागृहात चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना मी मनात कसलाही भेदभाव न बाळगता संपूर्ण मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून काम करत असते. याच भावनेतून माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या धाड शहर व आसपासच्या परिसरातील नागरी समस्या सोडवून विकास कार्य करण्याचा व जनतेची सेवा करण्याचा मी संकल्प केला आहे. सध्या धाड भागात विविध विकासकामे सुरू आहेत. येणार्‍या काळातही विकासाची ही गंगोत्री अशीच वाहती राहणार असून जनसेवेच्या पूर्ततेसाठी आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही आ. महाले यांनी दिली.


वैभव मोहितेंचा गर्व वाटतो!

निवडणुकांमध्ये उमेदवारांकडे विविध मागण्या केल्या जातात. कोणी सभामंडप मागतं, तर कोणी वैयक्तिक स्वार्थ साधून घेतं. असंच काही वैभव मोहितेलाही करता आलं असतं. श्वेताताईंना म्हणाला असता, मी जि.प.ला उभा राहतो, तुम्ही पाठींबा द्या. सरंपच, जि.प. सदस्यही होता आलं असतं, वेळप्रसंगी पैसेही खाता आले असते. पण आमच्या वैभव मोहिते यांनी मागितलं तर काय मागितलं, सामान्यांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका मागितली, या गोष्टीचा मला आनंद आणि गर्व असल्याचे गौरवोद्गार काढत आ. बच्चू कडू यांनी वैभव मोहिते यांच्या रुग्णसेवेला सलाम केला.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!