सोलापूर जिल्ह्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासनाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. अक्कलकोट शहरात नगरपरिषद नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ येथे आपला दवाखान्याचे जिल्हास्तरीय उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते झाले.
यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर होते. तर प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे हे होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव उपस्थित होते.
राज्यातील शहरी भागातील जनसामान्य गोरगरीब झोपडपट्टी भागात राहणार्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळावा हा एकच ध्यास घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. आता महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून हे दवाखाने नागरिकांच्या सेवेत समर्पित होणार आहे. या अनुषंगाने राज्यात तीनशे बेचाळीस आपला दवाखाना केंद्राचे डिजिटल अनावरण व लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत १ मे २०२३ रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशा आठ ठिकाणी हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार, किरकोळ जखमावर मलमपट्टी यास रक्त चाचणीची सेवा मोफत उपलब्ध करून देणार दिली जाणार आहे. याशिवाय क्ष- किरण (एक्स-रे ) सोनोग्राफी इत्यादी चाचणी करता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात सबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष तज्ञाच्या सेवा देखील उपलब्ध होतील. अशा नगरपालिका/भाड्याच्या इमारतीत हे दवाखाने राहणार आहेत. यात ओपीडी स्वरूपात सेवा देण्यात येणार आहे.