‘खासदारकी’चे स्वप्न पाहणार्या भाजपला बाजार समित्यांच्या मतदारांनी का झिडकारले?
– चिखली, जळगाव जामोद, खामगाव-शेगावमध्ये विद्यमान आमदारांसाठी धोक्याची घंटा!
– खासदार प्रतापरावांनी मेहकर, लोणार बाजार समित्या राखल्या; तरी महाविकास आघाडीची ताकद दिसली!
पुरूषोत्तम सांगळे
बुलढाणा – जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या निकालांनी ‘जिल्ह्याचा राजकीय मूड’ स्पष्ट केला आहे. प्रत्येक गावातील १० ते २० मतदार असलेल्या या बाजार समित्यांच्या मतदारांनी लोकभावनेचा विचार करून आपले मत दिले; आणि सत्ताधारी भाजपला झिडकारत, बुलढाणेकरांच्या मनातील शिवसेनेतील बंडखोरीवरून असलेला राग मतपेटीतून चव्हाट्यावर आणला. या निवडणुका आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरल्यात. शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकर व लोणार या दोन बाजार समित्यांतील त्यांची सत्ता कायम राखली असली, तरी त्या जिंकण्यासाठी यंदा पहिल्यांदाच त्यांच्या नाकात एवढा दम आणला गेला असेल! महाविकास आघाडीने त्यांना दिलेली झुंज ही राजकीय परिवर्तनाचे संकेत आहेत. चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचा तर मतदारांनी दारूण पराभव केला. खामगावात भाजपचे आ. आकाश फुंडकर यांना तरी थोडेफार यश लाभले, पण चिखली, शेगावमध्ये भाजपप्रणित पॅनलचा सुफडासाफ झाला. एकही जागा न जिंकता येण्याची नामुष्की आमदार संजय कुटे यांच्यावर ओढावली. चिखलीत आ.श्वेताताईंच्या पॅनलला कशीबशी एक जागा मिळाली. चिखलीचे ‘बाजीगर’ आपणच आहोत, ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी दाखवून दिले. दहापैकी फक्त एका बाजार समितीवर भाजपला झेंडा रोवता आला, तोही पक्ष म्हणून नव्हे तर माजी आ. चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाचा करिष्मा म्हणून!, तर शिंदे गटाने दोन बाजार समित्या कशाबशा जिंकून लाज राखली असली तरी, महाविकास आघाडीने घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद आहे. शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र राहिले अन लढले तर जिल्ह्यातील लोकसभा व सर्व विधानसभा निवडणुका जिंकता येणे शक्य आहे, असा सुस्पष्ट संदेश मतदारांनी या निवडणुकीतून दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडल्या. पहिल्या टप्प्यांत पाचपैकी तीन बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकल्यात. तर दुसया टप्प्यात पाचपैकी चार बाजार समित्या महाविकास आघाडीने जिंकत भाजप-शिंदे गटाला दणका दिला. खामगावमध्ये काँग्रेसचे माजी आ. दिलीपकुमार सानंदा, बुलढाण्यात शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, देऊळगावराजात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, चिखलीत माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शेगावमध्ये काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील, नांदुरामध्ये काँग्रेसचे आमदार राजेश एकडे, जळगाव जामोदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलने बाजार समित्या ताब्यात घेतल्यात. भाजपला केवळ मलकापुरात माजी आ. चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात यश मिळाले. मेहकर व लोणारमध्ये शिवसेना (ठाकरे) खासदार प्रतापराव जाधव यांना बाजार समितीवर शिंदे गटाचा भगवा फडकाविता आला. एकूणच दहा बाजार समित्यांपैकी सात बाजार समित्यांवर महाविकास आघाडी, एका बाजार समितीवर भाजप तर दोन बाजार समित्यांवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. मलकापुरात भाजपला आलेले यश हे पक्ष म्हणून नव्हते, तर माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाचा तो खासगी करिष्मा होता. या मतदारसंघात त्यांचे नेटवर्क उत्तमरित्या काम करत असल्याची ती पावती आहे. एकूणच, या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कौल हा भाजपविरोधी आला आहे. बुलढाणा लोकसभेची जागा जिंकण्याचे स्वप्न पाहणार्या भाजपसाठी ही सर्वात मोठी नामुष्की आहे, तसेच शिंदे गटाला मेहकर-लोणारपलिकडे कुणी विचारत नाही? हेही या निकालातून दिसून आले.
बाजार समित्यांच्या निकालानुसार, आजरोजी जरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तरी, चिखली, देऊळगावराजा-सिंदखेडराजा, बुलढाणा, मलकापूर-मोताळा, खामगाव-शेगाव, जळगाव जामोद – नांदुरा या मतदारसंघांत भाजप किंवा शिंदे गटाचा आमदार पराभूत होणे निश्चित आहे. तसेच, लोकसभेसाठीही भाजप किंवा शिंदे गटाला यश मिळणे दुरापास्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, आणि भाजपच्या सहाय्याने राज्यात सत्ता मिळवली. किंबहुना, भाजपने शिंदे यांना शिवसेना फोडायला लावली, अशी टीका होत असताना, हा राजकीय उपदव्याप बुलढाणेकरांना अजिबात रूचलेला नाही. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गावात १० ते २० मतदार असलेल्या ‘सिलेक्टेड’ मतदारांनी लोकांच्या मनातील भावनांचा विचार करून आपले मत मतपेटीत टाकले होते. परिणामस्वरूप, बाजार समितीच्या मतदारांनी भाजप व शिंदे गटाला झिडकारल्याचे दिसून आले आहे. दहापैकी सात बाजार समित्या जिंकणे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी शुभसंकेत असून, या निवडणुका ज्याप्रमाणे एकदिलाने लढल्या गेल्यात, त्याच क्षमतेने व एकत्र राहून पुढील कोणत्याही निवडणुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लढल्या तर त्यांना यश मिळणे निश्चित आहे. जिल्ह्यातून भाजपची लाट आता हद्दपार झाली आहे. महाविकास आघाडीची लाट निर्माण झाली आहे. या लाटेची तीव्रता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांतही कायम ठेवणे गरजेचे आहे.
श्वेताताईंनी या पराभवातून शिकावे!
चिखली बाजार समिती निवडणूक ही भाजपच्या आमदार श्वेताताई महाले यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीसाठी ताईंनी एक अन् एक मतदाराशी वैयक्तिक संपर्क केला. प्रत्येक गावात त्या गेल्या, बैठका घेतल्या, इतरही राजकीय तडजोडी केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए व मंत्रालयात उपसचिव असलेले विद्याधर महाले हेदेखील या बाजार समितीच्या राजकीय रणनीतीवर लक्ष ठेवून होते. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आ. धृपतराव सावळे यांनीही बाजार समितीत लक्ष घातले होते. विद्यमान संचालकांचे अर्ज बाद करणे, व इतर प्रकार घडून हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. या सर्व प्रकारांत ताईंची प्रतिमा खराब झाली, व त्याचा विरोधक म्हणून माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सहानुभूती मिळवत राजकीय लाभ घेतला. बाजार समितीच्या पराभवातून बरेच काही शिकण्यासारखे असून, मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे विजय सोपा झाला होता. आता तसा चमत्कार पुन्हा घडणार नाही, हे ताईंनी लक्षात घ्यावे.
——————