BULDHANAHead linesLONARMEHAKARVidharbha

‘अवकाळी’ने दाणादाण; ‘लग्नाघरी विघ्न’, शेतीपिकांचीही नासाडी!

– गारपीट, सोसाट्याच्या वार्‍याने आंबा, लिंबूसह फळबागा, कांद्याचे नुकसान
– भुईमूगाला फुटले कोंब, शेतकरी चिंतातूर!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस उसंत घ्यायला तयारच नाही. त्यामुळे हा अवकाळी आहे की पावसाळी, असा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. दरम्यान, काल व परवा रात्री मेहकर व खामगाव तालुक्यात वादळ व गारांसह तुफान पाऊस झाला. यामुळे आंबा, लिंबू, कांदा या पिकांसह फळबागा तसेच मूग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर काढणीला आलेल्या भुईमूगाला कोंब आले आहेत. संकटाची मालिकाच सुरू असल्याने शेतकरी खचला असून, अगोदरच्या नुकसानीचा अद्याप ढेलाही मिळाला नाही. त्यातच हे नवीन नुकसान पदरात पडले आहे. अचानक येणार्‍या पावसामुळे लग्नघरांतही विघ्न येत असून, लग्न मंडपींची एकच धावपळ उडत आहे. ऐन पंगत बसताना किंवा मंगलाष्टके सुरू असताना वादळांसह पाऊस येत असल्याने लग्नघरांवर मोठे संकट कोसळत आहे.

यावर्षी पाऊस पिच्छा सोड़ायला तयार नाही. पावसाळ्यातही जोराचा पाऊस पड़ला. त्यामुळे हातचे पीक गेले. उन्हाळयातही अवकाळी सुरूच आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात या पावसाने मोठे नुकसान झाले. रब्बी पिके हातची गेली. त्यामुळे शेतकरी पार वैतागला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खामगाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून मदत देण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप काहीच हालचाल दिसत नाही. पावसामुळे शेतकरी चिंतेत असताना काल व परवा मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, नायगाव देशमुख, पारखेड़, मांड़वा, वरवंड़, जानेफळ, वागदेव, वड़ाळी तसेच खामगाव तालुक्यातील शिर्ला, आंबेटाकळी, अटाळी, बोरी अड़गाव, रोहणा यासह इतर भागात वादळ व गारांसह धड़ाक्याचा पाऊस झाला. यामुळे फळबागा तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

देऊळगाव साकरशा परिसरात तर लिंबाएवढी गार पड़ल्याने आंबा, लिंबू यासह फळबागा तसेच मूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देऊळगाव साकरशा परिसरात उन्हाळी भुईमूग मोठ्या प्रमाणात पेरला जातो. यातील काढणीला आलेल्या भुईमूगाला तर कोंब येत आहेत. तर गणेश गायकवाड़सह फळबागा लावलेल्या शेतात लिंबू, आंबा, सह इतर फळांचा फळबागेत सड़ा पड़लेला आहे. तरी पाहणी करून सरसकट मदत त्वरित द्यावी, अशी रास्त मागणी शेतकरीवर्ग सरकारकडे करत आहेत. अचानक पड़णार्‍या अवकाळी पावसामुळे लग्न मंड़पीचीही एकच धावपळ उडत असल्याचे दुर्देवी चित्र गावोगावी आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!