– ट्रॅक्टरखाली पळाल्यामुळे वाचला बकरीमालकांचा जीव!
सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – साखरखेर्डा परिसरासह तालुक्याला सोसाट्याचा वारा, गारपिटीने झोडपून काढले. रविवारी सकाळी सात वाजेपासून सुरू झालेला पाऊस दुपारपर्यंत सुरू होता. या पावसात वीज पडून १४ बकर्या जागीच ठार झाल्या असून, दोन बकर्या गंभीर जखमी झालेल्या आहेत. तालुक्यातील रताळी येथे ही दुर्देवी घटना घडली. या बकर्यांचे मालक तातडीने ट्रॅक्टरखाली पळाल्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचला. या दुर्देवी घटनेत बकरीमालकाचे तब्बल दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात भरउन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. ३० एप्रिलरोजी रविवारलादेखी सकाळी ७ वाजेपासून दीड तास साखरखेर्डा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारादेखील होता. रताळी येथील भिकाजी सखाराम जाधव हे त्यांच्या बकर्या घेऊन शशिकला आव्हाळे यांच्या शेतात चारण्याकरिता गेले असता, अचानक मोठ्याने विजेचा कडकडाट झाला आणि वीज बकर्यांच्या अंगावरती पडली. त्यात १४ बकर्या जागीच ठार झाल्या व दोन बकर्या गंभीरित्या जखमी झालेल्या आहेत.
बकरीमालक भिकाजी जाधव हे विजेचा कडकडाट होताच शेजारील ट्रॅक्टरखाली पळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळताच, महसूल विभागाचे तलाठी, ग्रामसेवक, त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे जमादार अनील वाघ यांनीदेखील घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. यामध्ये भिकाजी जाधव यांच्या १४ बकर्या मरण पावल्या, व दोन बकर्या जखमी झालेल्या आहेत. जाधव यांचे तब्बल दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तरी घटनेचा पंचनामा होऊन तातडीने शेळीमालकाला मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती शिक्षक भानुदास लव्हाळे व अक्षय गोरे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला कळविली होती.
————-