Breaking newsHead linesWorld update

नक्षलवाद्यांच्या स्फोटात ११ जवान शहीद

– आयईडी स्फोटाने उडविले वाहन, अनेक पोलिसही गंभीर जखमी

रायपूर (वृत्तसंस्था) – छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दलाचे वाहन नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटकांनी उडवून दिले. या भीषण स्फोटात दहा जवान व एक चालक असे ११ जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले असून, नक्षली आणि पोलीस यांच्यात तुफान चकमक सुरू आहे. अरणपूरच्या पालनार भागात हा स्फोट व चकमक घडली.

नक्षलवाद्यांनी रस्त्यात पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. याच रस्त्यावरून छत्तीसगडच्या पोलिसांचे वाहन जात होते. यात स्फोटात छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे ११ जवान शहीद झाले आहेत. भू-सुरुंगाचा स्फोट घडवल्यानंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जखमी जवानांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दूरध्वनीकरून माहिती दिली असून, केंद्र सरकारची मदत मागितली आहे. नक्षलवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्यांना मुळासकट उपटून काढू, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

नक्षलवाद्यांनी घडविलेला हा आयईडी स्फोट इतका भीषण होता, की रस्त्यावर अनेक फूट खोल खड्डा तयार झाला होता. या स्फोटात जवानांचे वाहन जळून खाक झाले आहे. याबाबत माहिती देताना बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी अरणपूरच्या पालनार भागात जवानांना लक्ष्य केले. सध्या शोधमोहीम सुरू आहे. डीआरजी जवान काल ऑपरेशनवर गेले होते. परतत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. घटनेचं गांभीर्य पाहात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माहिती देण्यात आली आहे. शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री बघेल यांनी फोनवर चर्चा केली आहे. अतिरिक्त मदत पोहोचवण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!