Breaking newsHead linesWorld update

पंजाबचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांचे निधन

चंदीगढ (प्रतिनिधी) – पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे माजी अध्यक्ष सरदार प्रकाशसिंग बादल यांचे मंगळवारी मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दीर्घ आजाराने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांचा मुलगा आणि पक्षाध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या पीएने या वृत्ताला दुजोरा दिला. बादल यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर आठवडाभरापूर्वी मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान वयाच्या ९५ व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने बादल यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रकाशसिंग बादल यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. गेल्यावर्षीही त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. तसेच, कोरोनाची लागणही त्यांना झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बादल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ट्वीट करत मोदींनी नमूद केले, की ‘प्रकाशसिंग बादल यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. पंजाब राज्याच्या विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.’ प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील भटिंडा येथील अबुल खुराना गावात झाला. त्यांना पीसीएस अधिकारी बनायचे होते, पण अकाली दलाचे नेते ग्यानी करतारसिंग यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९४७ मध्ये गावाचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

अनेक दशकांपासून पंजाबच्या राजकारणाचा ते महत्त्वाचा चेहरा राहिले. त्यांनी गेल्यावर्षी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यांची राजकीय कारकीर्द १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला सुरू केली आणि गेली अनेक वर्षे ते काँग्रेससह विविध राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. त्यांनी १९७०-७१, १९७७-८० पर्यंत पाचवेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. १९७० मध्ये ४३ वर्षांचे असताना ते पंजाबचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनले. बादल यांनी एकूण ५ वेळा पंजाबचे मुख्यमंत्रिपद भूषवले. हा त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रमही आहे. एकीकडे ते पंजाबचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनले, तर दुसरीकडे जेव्हा त्यांनी २०१७ मध्ये मुख्यमंत्री म्हणून पाचवा कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा ते सर्वांत वयस्कर मुख्यमंत्रीदेखील होते. त्यावेळी त्यांचे वय ९० वर्षं होते.

बादल हे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख होते. हा पक्ष नेहमी शीखांच्या प्रतिनिधीत्वाबद्दल बोलत आला आहे. या पक्षाने अनेकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे जाणार्‍या भाजपला पाठिंबादेखील दिला होता. बादल यांच्या पत्नी सुरिंदर कौर यांचे यापूर्वीच निधन झालेले आहे. त्यांचा मुलगा सुखबीरसिंग बादल आणि सून हरसिमरत कौर बादल हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!