खारघर दुर्घटनेत ५०पेक्षा जास्त बळी, सरकारकडून आकड्यांची लपवालपवी!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खारघर येथील अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे ५० पेक्षा जास्त श्रीसेवकांचा मृत्यू झाला असून, राज्य सरकार आकडे लपवित आहेत. या दुर्देवी घटनेबद्दल व्यापक चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केली. काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल बोंद्रे बोलत होते.
या पत्रकार परिषदेला आमदार धीरज लिंगाडे, काँग्रेस नेते श्याम उमाळकर, जयश्री शेळके, सुनील सपकाळ, सतीश महेंद्र, दत्ता काकस आदी नेतेही हजर होते. राहुल बोंद्रे म्हणाले, की ५० पेक्षा जास्त बळी जावूनही हे राज्य सरकार मृत्यूचे खरे आकडे लपवित आहे. यामुळे नैतिक जवाबदारी स्वीकारून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. राज्यकर्ते या दुर्घटनेची जबाबदारी श्रीसेवकांवर ढकलत आहेत. या कार्यक्रमावर शासनाने तब्बल १३ कोटी रुपये खर्च केले. व्यासपीठावर असलेल्या नेत्यांची व्हीआयपी पद्धतीने बडदास्त ठेवण्यात आली. एसी, कुलर असा सारा थाट होता. मात्र, लाखो सेवकांसाठी साधे शामियाने, पेयजलाचीसुद्धा व्यवस्था का करण्यात आली नाही? हा आमचा सवाल आहे, असेही बोंद्रे यांनी सांगितले.
कोट्यवधी खर्च करून शाही कार्यक्रम सुरू असताना अनेक श्रीसेवक तडफडून मेले, अनेकांना भोवळ आली. त्यांना रुग्णवाहिकांद्वारे रुग्णालयात नेत असतांनाही नेत्यांची भाषणबाजी सुरूच होती, हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हा शासकीय सोहळा राजभवनात आयोजित करण्याऐवजी बेजवाबदरपणे उघड्यावर घेण्यात आला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये शेकडो सेवक जायबंदी झाले. मुळात राज्यकर्त्यांनी कार्यक्रम राजकीय करून टाकला, अशी टीकाही राहुल बोंद्रे यांनी केली.
शेतकरी का आत्महत्या करतोय? याचं उत्तर देशात आणि राज्यात सत्ता असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे. गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांसाठी मदतीच्या घोषणांचे पाऊस पाडायचे काम E-D सरकारकडून सुरु आहे. परंतु शेतकऱ्यांपर्यंत अजून मदत पोहचली नाही, त्यांचा कापूसही खरेदी झाला नाही.